बीड : अजित पवार यांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील पक्ष नेमका कोणाचा याच्या वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. शिवसेनेचा अनुभव पाहता शरद पवार गटाने सुरुवातीपासूनच खंबीर पावले उचलायला सुरुवात केली आहे. उद्या (दि. ५ ) राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटाच्या वेगवेगळ्या बैठका होत आहेत. या दरम्यान शरद पवार गटाने आता पदाधिकाऱ्यांकडून शपथपत्र भरून घेणे सुरु केले आहे.
शरद पवार गटाची बैठक उद्या (दि. ५ ) रोजी होत आहे. यासाठी राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. या बैठकीला येताना प्रत्येकाने आपल्यासोबत शरद पवार यांच्याप्रतीच आपली निष्ठा असल्याचे शपथपत्र घेऊन यावे असे आवाहन शरद पवार गटाकडून करण्यात आले आहे. यासाठीच्या शपथपत्राचा मसुदा सर्वांना पाठविण्यात आला आहे.
या शपथपत्रात आपल्या पदाचा उल्लेख प्रत्येकाने करावयाचा आहे. त्यासोबतच आपण शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबतच असल्याचा उल्लेख असून अजित पवार आणि त्यांच्या सहकारी आमदारांच्या कृतीचा निषेध देखील शपथपत्राद्वारे करावयाचा आहे. शिवसेनेने जशी आपापल्या समर्थकांची शपथपत्र निवडणूक आयोगाला दिली होती, त्याच धर्तीवर आता राष्ट्रवादीमधील वाद चालणार असल्याचे स्पष्ट आहे.