भारतीय संघ काही दिवसांत वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआयने एक मोठी घोषणा केली आहे.बीसीसीआयने जाहीर केले की, ड्रीम इलेव्हन पुढील तीन वर्षांसाठी भारतीय संघाचा मुख्य प्रायोजक असेल. वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी मालिकेतून भारतीय संघाच्या जर्सीवर ड्रीम इलेव्हनचे नाव दिसणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ सायकलमधील टीम इंडियाचा हा पहिला सामना असेल. ड्रीम इलेव्हन बायजूसची जागा घेईल
बीसीसीआय आणि ड्रीम इलेव्हनची भागीदारी मजबूत होत आहे – बीसीसीआय अध्यक्ष
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, “मी ड्रीम इलेव्हनचे अभिनंदन करतो आणि बोर्डात त्यांचे पुन्हा स्वागत करतो. बीसीसीआयचा अधिकृत प्रायोजक असण्यापासून ते आता मुख्य प्रायोजक होण्यापर्यंत, बीसीसीआय आणि ड्रीम इलेव्हनची भागीदारी मजबूत होत आहे. भारतीय क्रिकेटचा विश्वास, मूल्य, क्षमता आणि वाढीचा हा एक पुरावा आहे. आम्ही या वर्षाच्या अखेरीस आयसीसी विश्वचषक आयोजित करण्याची तयारी करत असताना, दर्शकांचा अनुभव वाढवणे हे आमच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे की, ही भागीदारी आम्हाला चाहत्यांच्या सहभागाचा अनुभव वाढविण्यात मदत करेल.”
राष्ट्रीय संघासाठी मुख्य प्रायोजक असणे अभिमानाची बाब – ड्रीम स्पोर्ट्सचे सह-संस्थापक
या भागीदारीबद्दल भाष्य करताना, ड्रीम स्पोर्ट्सचे सह-संस्थापक आणि सीईओ हर्ष जैन म्हणाले, “बीसीसीआय आणि टीम इंडियाचे दीर्घकाळ भागीदार म्हणून, ड्रीम इलेव्हन आमची भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी रोमांचित आहे. ड्रीम इलेव्हनमध्ये, आम्ही एक अब्ज भारतीय क्रिकेट चाहत्यांसोबत आमचे क्रिकेट प्रेम शेअर करतो आणि राष्ट्रीय संघासाठी मुख्य प्रायोजक असणे ही अभिमानाची आणि सौभाग्याची बाब आहे. आम्ही भारतीय क्रीडा इकोसिस्टमला सतत पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहोत.” विशेष म्हणजे अलीकडेच टीम इंडियाचा किट प्रायोजकही बदलला आहे. आदिदासने भारतीय क्रिकेट संघाचा नवीन किट प्रायोजक बनला आहे. आदिदासने ‘किलर’ची जागा घेतली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी