Advertisement

राज्यातील 12 कोटी जनतेला 'आरोग्य सुरक्षा कवच'

प्रजापत्र | Wednesday, 28/06/2023
बातमी शेअर करा

 

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्यातील सर्व जनतेसाठी महत्त्वाचा आहे. कारण या योजनेमुळे महाराष्ट्रातील सर्व जनतेला आरोग्य सुरक्षा कवच मिळणार आहे. कारण, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय झाला आहे. या योजनेंतर्गत प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून 5 लाख रुपये एवढा करण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

 

 

अर्थसंकल्पात केली होती घोषणा
गृहमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्प मांडतांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या उपचार मर्यादा दीड लाखावरून पाच लाखापर्यंत करण्याची घोषणा केली होती. तर त्या घोषणेची आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत अधिकृत मान्यता दिली आहे.

 

या निर्णयामुळे काय होणार लाभ
राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, यापुढे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त होणार आहे. विद्यमान महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य या एकात्मिक योजनेत काही बदल करून योजनेचे विस्तारीकरण करून सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
अशाप्रकारे केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गग विमा कवच प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लाख रुपये आहे. आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लाख रूपये एवढे करण्यात आले आहे.

 

 

दोन्ही योजनांचे एकच कार्ड होणार
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमल बजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे. तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार आहेत. आता दोन्ही योजनांमध्ये उपचारांची संख्या साडे तेराशेच्या पुढे गेली आहे. महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रुग्णालयाची संख्या एक हजार एवढी आहे.

 

 

200 रुग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता
महात्मा फुले जन आरोग्य योजना ही याआधीच महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्ह्यांत 140 व कर्नाटक राज्यातील 10 अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याव्यतिरिक्त 200 रुग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

 

रस्ते अपघात विमा योजनेत 1 लाखांची मदत
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या 74 वरून 184 अशी वाढविण्यात आली आहे. उपचाराच्या खर्च मर्यादेत तीस हजारांवरून प्रती रुग्ण प्रती अपघात 1 लाख रूपये, अशी वाढ करण्यात आली आहे. या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement