एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारची तिच्याच मित्राने निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यात भरदिवसा एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. एकीकडे पुण्यासारख्या शहरात हे होत असतानाच राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या ना त्या कारणावरून थेट मुडदे पडत आहेत. नाशिकमध्ये झालेली तरुणाची हत्या असेल किंवा जालना शहरात झालेला खून , राज्यात महिलांची, सामान्यांची सुरक्षाच धोक्यात आल्याचे चित्र आहे. महिलांची सुरक्षा हा तर महत्वाचा मुद्दा आहेच, पण एकंदरच राज्यातील शांततेला ग्रहण लागत असून सामान्य माणूस भयभीत वाहवा अशीच परिस्थिती आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधक यावर बोलण्या ऐवजी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत.
एकेकाळी महाराष्ट्राची ओळख एक शांतताप्रिय, पुरोगामी राज्य होती, मात्र हा इतिहास झाला आहे असे म्हणावे लागेल की काय असे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. पुण्यासारख्या शांत शहरामध्ये देखील दिवसाढवळ्या जर एखाद्या मुलीवर कोयत्याने वार होत असतील तर कायद्याचा धाक नावाचा काही प्रकार औषधाला तरी शिल्लक राहिला आहे का असा प्रश्न कोणालाही पडायला हरकत नाही. बरे हे काही फक्त पुण्यात घडत आहे असेही नाही. मागच्या महिना दोन महिन्यातील घटनाक्रम पहिला तर राज्याच्या वेगवेगळ्या भागातील घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. महिलांवर होणारे हल्ले असतील किंवा जातीय, धार्मिक मानसिकतेतून होणारे असतील , हे सारे महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे असा विचार करायला भाग पाडणारे आहेत.
महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी असेल किंवा समाजकंटकांवर नसलेला शासनाचा किंवा कायद्याचा अंकुश, यातून महाराष्ट्र एक भयग्रस्त राज्य बनत चालले आहे. छोट्या छोट्या कारणांमधून बीड सारख्या शहरात होणाऱ्या गोळीबाराच्या घटना असतील, एकतर्फी प्रेमातून थेट मैत्रिणीचा खून करण्याची पुण्यासारख्या शहरात फोफावत असलेली मानसिकता असेल, अक्षय भालेराव या तरुणाची झालेली हत्या असेल, किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न असेल, गुन्हेगार किंवा समाजकंटक यांच्यात अचानकच इतका मस्तवालपणा का येत आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे असे वाटले पाहिजे. कायदा मोडल्यावर अडचणी येऊ शकतात असा धाक तरी किमान गुन्हेगारांमध्ये निर्माण झाला पाहिजे हे कोणत्याही शासन व्यवस्थेचे काम असते. पोलीस यंत्रणेने किमान तसे वागायला हवे असते. आपल्या कृतीतून ती जरब निर्माण करावयाची असते, मात्र राज्याच्या वेगवेगळ्या भागात सध्या जे काही घडत आहे, त्यातून पोलिसांची किंवा सरकारची अशी काही जरब राहिली आहे असे वाटण्यासारखी परिस्थिती अस्तित्वात नाही.
राजकारणाचे होत असलेले गुन्हेगारीकरण, गुन्हेगारांना मिळत असलेला राजश्रय, त्यांना मिळत असलेले अवास्तव महत्व आणि एकंदरच पोलिसांची सुद्धा गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आज राज्याची अवस्था अशी झाली आहे. कांही लोकांनी काहीही केले तरी काहीच होत नाही, किंवा राजकीय वरदहस्त असेल तर एका रात्रीत आपण बाहेर येऊ शकतो हा जो मस्तवालपणा एकंदरच व्यवस्थेने तरुणाईच्या मनात निर्माण केला आहे, त्यामुळे देखील आपण अराजकाच्या वाटेवर म्हणा किंवा उंबरठ्यावर म्हणा, उभे आहोत हे असे चित्र आहे.
पुणे काय किंवा बीड काय आणखी कोणतेही शहर, गाव सर्वदूर कायदा हातात घेण्याची मानसिकता दिवसेंदिवस अधिकच वाढीस लागत आहे. आणि त्यातून महाराष्ट्र सामान्यांना असुरक्षित होईल का काय अशी भीती निर्माण होत आहे. मात्र यावर विचार करायला आणि याचे उत्तर द्यायला सत्ताधाऱ्यांना वेळ आहे कुठे?