मुंबई - आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला जबर झटका बसला आहे. ठाकरे गटाकडून या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याचा टीझरही रिलीजही करण्यात आला आहे. पण मुंबई पोलिसांनी परवानगीच नाकारल्याने ठाकरेंची मोठी गोची झाली आहे. या प्रकरणी पक्षाचे एक शिष्टमंडळ लवकरच मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहे.
मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. या प्रकरणात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण हे अडचणीत आले आहेत. तसेच खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय देखील अडचणीत आले आहेत.
उद्धव ठाकरेंचे वक्तव्य?
शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी मुंबईला कुणी मायबाप राहिलेले नाही. सध्या लुटारूंच राज्य सुरू आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. तसेच, मुंबई पालिकेत सध्या प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहेत. त्याला वाचा फोडण्यासाठी 1 जुलैला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार, अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.
आदित्य ठाकरेंच्या नेर्तृत्वाखाली मोर्चा
उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईला मायबाप कुणी मायबाप राहिले नाही. रस्ता, पाणी, वीज सर्व कामांत प्रचंड भ्रष्टाचार केला जात आहे. आम्ही सत्तेत असताना तुटीतील मुंबई महापालिका आम्ही नफ्यात आणली. मात्र, आज मुंबईकरांचा पैसा बिल्डरांच्या घशात घातला जात आहे. लोकांची कामेसुद्धा होताना दिसत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड खदखद आहे. याचा जाब विचारण्यासाठी 1 जुलैला शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार. आदित्य ठाकरे या मोर्चाचे नेर्तृत्व करतील.
भाषा शोभत नाही - मुख्यमंत्री शिंदे
दरोडा टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीचा भाषा शोभत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या मुंबई महापालिकेवरील प्रस्तावित मोर्चावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 15 ते 20 वर्षे ज्यांनी मुंबई मनपावर दरोडा टाकला, त्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही. मुंबई मनपाचे हजारो कोटी कुठे गेले याचा हिशेब आता कॅग विचारणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
मोर्चाच्या रुटवर चर्चा
जसा मविआचा मोर्चा झाला तशा मोर्चा काढण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. केवळ रुटवरुन चर्चा करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली असून, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली नाही, तर केवळ रुट संदर्भात आम्ही भेट घेतली असे त्यांनी स्पष्ट केले.