Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - आता सरकार करणार का कारवाई?

प्रजापत्र | Tuesday, 27/06/2023
बातमी शेअर करा

 

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या संदर्भाने म्हणा किंवा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताच्या संदर्भाने म्हणा, कोणी अवमानात्मक विधान केले असते तर सरकारने आतापर्यंत त्याला देशद्रोही ठरवून कारवाई केली असती, आणि तशी ती व्हायलाही हरकत नाही. राष्ट्रधवज, राष्ट्रगीत ही राष्ट्रीय प्रतिके आहेत, त्याबद्दल आदर असलाच पाहिजे. मात्र आपल्याकडे सध्या एखाद्या बाबीचा अवमान कोण करतो, यावर पुढची प्रतिक्रिया ठरत असते. म्हणूनच ज्यावेळी संभाजी भिडेंसारखा माणूस १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन काळा दिवस असल्याचे जाहीरपणे सांगतो, तरी त्याच्यावर कारवाई करण्याची हिम्मत कथित राष्ट्रभक्तीने प्रेरित सरकार करीत नाही, किंवा भाजपची मंडळी त्यावर आगपाखड देखील करीत नाहीत.

 

 

 

     'जन गण मन' हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रविंद्रनाथ टागोर यांनी ते १८९८ ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहिले होते. १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा. भारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्वीकारला जात नाही, तोपर्यंत शांत बसायचं नाही, असे विधान जर विरोधी पक्षातल्या कोणी केले असते, किंवा अल्पसंख्यांक समुदायातील एखाद्याने केले असते, तर आतापर्यंत भाजपच्या समाज माध्यमांमधील अर्धवटरावानी त्याची पुरती नालस्ती केली असती आणि सरकारने देखील त्या व्यक्तीची गठडी वळली असती.

 

 

 देशाच्या स्वाभिमानाबद्दल, राष्ट्रध्वजाबद्दल कोणी काही बोलतो म्हणजे काय, असे बोलणारा देशद्रोहीच असे म्हणायला तमाम भाजपेयी, सरकारमध्ये बसलेले सारे एकवटले असते. अर्थात देशाबद्दल, देशाच्या स्वातंत्र्यदिनाबद्दल, राष्ट्रध्वजाबद्दल कोणी अवमानकारक बोलले नाहीच पाहिजे. त्यामुळे अशी काही कारवाई झाली तर त्याबद्दल आक्षेप घेण्यासारखे कांहीच नाही. मात्र इतके अवमानकारक बोलून आणि १५ ऑगस्टला दुखवटा पाळला पाहिजे असे आवाहन करून देखील ज्यावेळी सरकारला यात काही गंभीर वाटत नसते, किंवा समाज माध्यमांमधील भाजपाचे वाचाळवीर शांत असतात याचा अर्थच त्यांच्या पोटातलेच कोणाच्या तरी माध्यमातून ओठावर आलेले असते, आणि ते ओठ जेव्हा संभाजी भिडे याचे असतात, त्यावेळी तर भाजप काय किंवा सरकार काय यांच्यासाठी ती 'आज्ञाच' असते.

संभाजी भिडे या व्यक्तीने कायम महाराष्ट्रात द्वेष पसरविण्याचे काम केलेले आहे. रयतेचे राजे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करणे असेल, त्यांना एखाद्या धर्माचा शत्रू म्हणून समोर आणणे असेल किंवा आणखी काही, संभाजी भिडे याने या महाराष्ट्राला वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न कायम केलेला आहे. वारीमध्ये धारकरी घुसत असतील तर विचारांची ही कोणती दिशा आहे हे सहज लक्षात येऊ शकते. मात्र संभाजी भिडे काहीही बोलले, त्यांनी कितीही द्वेषपूर्ण भाषा वापरली तरी या महाराष्ट्रात त्यांच्यावर कारवाई होऊच शकत नाही. कारण सत्तेच्या दृष्टीने त्यांचा शब्द म्हणजे 'आज्ञा ' आणि म्हणूनच संभाजी भिडे आता आपला खरा अजेंडा रेटीत आहेत. 

     संभाजी भिडे संघ परिवारात अधिकृतपणे होते का नाही, हे माहित नाही, कारण ज्यावेळी कोणतीही व्यक्ती काहीतरी वादग्रस्त बोलते, त्यावेळी संघ परिवार त्या व्यक्तीपासून अंतर ठेवून वागत असतो. नथुराम गोडसेपासून अनेकांच्या बाबतीत हे घडले आहे. त्यामुळे या भिडेंशी उद्या संघ नाते सांगेल का नाही, ते माहित नाही. मात्र काही दशकांपूर्वी संघाच्या संस्कारात व्यक्ती जी भाषा बोलायचे तेच आता भिडे तारस्वरात सांगत आहेत. संघ परिवाराचे म्हणा किंवा आजच्या हिंदुत्ववाद्यांचे म्हणा, स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान होते हे देशाला माहित आहे. त्यांनी तो इतिहास कितीदाही बदलण्याचा प्रयत्न केला तरी तो बदलता येत नाही. आणि स्वातंत्र्यानंतर त्याचे स्वागत संघ परिवार किंवा तत्कालिन हिंदुत्ववाद्यांनी कसे केले होते हे देखील सर्वश्रूत आहे. त्यामुळे भिडे आज जे काही बोलत आहेत, ती भिडेंसारख्या अनेकांच्या मनातील साडेसात दशकाची मळमळ आहे, आणि हाच बुद्धिभेद हे लोक सातत्याने करीत आलेले आहेत. मात्र आता असल्या विद्वेषी विचारांना बळ दिले जात आहे, आणि म्हणूनच भिडे काहीही बोलले तरी सरकार त्यांच्यावर कारवाई करायला धजावत नाही.

     देशाच्या स्वातंत्र्याच्या संदर्भाने इतर कोणी असे बोलले असते तर सरकारने त्याचे जे केले असते, तोच न्याय संभाजी भिडेला दाखविण्याची हिम्मत आता सरकार करणार आहे का ?

 

Advertisement

Advertisement