भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना वारंवार पक्षात डावललं जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पाळंमुळं घट्ट करू पाहणाऱ्या बीआरएसने (भारत राष्ट्र समिती) पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रीपदाची खुली ऑफर दिली आहे. असं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे.
पंकजा मुंडे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. याबाबतची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माहीत आहे, असं विधान मिटकरी यांनी केलं आहे.
पंकजा मुंडेंची नाराजी आणि बीआरएसकडून दिलेल्या ऑफरबाबत विचारलं असता अमोल मिटकरी म्हणाले, “मध्यंतरी एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंची भेट घेतली होती. तेव्हापासूनच्या घडामोडी तुम्ही बारकाईने पाहत असाल, तर बऱ्याच प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. परवा कारखान्याची निवडणूक झाली, तेव्हा दोघंही बहीण-भाऊ (पकंजा मुंडे व धनंजय मुंडे) सामंजस्याने एकत्र आले. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, पंकजा मुंडे राष्ट्रवादी पक्षात येतील. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या महाराष्ट्राचं नेतृत्व आहेत. त्यामुळे त्या आपल्या पक्षात असाव्यात, असं प्रत्येकाला वाटलं. त्यामुळे मलाही वाटतं की, त्या आमच्या पक्षात असाव्यात.”
“बीआरएस ही अफूची गोळी आहे. बीआरएस हे नवीन गुलाबी वादळ आहे. बीआरएस किंवा एमआयएमने पंकजा मुंडेंना काय ऑफर द्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांच्या ऑफरला पंकजा मुंडे भाळतील आणि बीआरएसच्या गळाला लागलीत, असं मला वाटतं नाही. बीआरएसच्या गळाला जे लागले आहेत, त्यांचं महाराष्ट्रात भविष्य चांगलं नाही. कारण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी बीआरएसला अद्याप महाराष्ट्रातला चेहरा दिला नाही. त्यामुळे हे गुलाबी वादळ आहे, काही दिवसांत शांत होईल. मात्र पंकजाताई थोड्याच दिवसात त्यांचा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येतील, हे भाजपामध्ये फक्त चंद्रशेखर बावनकुळेंनाच माहीत आहे,” असं मोठं विधान अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
पंकजा मुंडे राष्ट्रवादीत आल्या तर त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल का? असं विचारलं असता अमोल मिटकरी पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री कुणाला करायचं? हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. मला जेवढं माहीत आहे, त्यानुसार बहुजन समाजात ओबीसीसाठी मोठा लढा उभारणाऱ्या गोपीनाथराव मुंडेंच्या त्या कन्या आहेत. त्या महाराष्ट्रात लीड करू शकतात. त्या कणखर नेतृत्व आहे. त्या आमच्या पक्षात आल्या तर आमच्या पक्षाचं बळ नक्कीच वाढणार आहे. राहिला प्रश्न मुख्यमंत्रीपदाचा तर तो सर्वस्वी निर्णय हा शरद पवारांचा असतो.”