मुंबईकर अजिंक्य रहाणे याचं टीम इंडियात दणक्यात पुनरागमन झालेय.. इतकेच नाही तर त्याच्याकडे मोठी जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या फायनलमध्ये अजिंक्य रहाणे याने चमकादर कामगिरी करत सर्वांचे मन जिंकले होते. 18 महिन्यानंतर जाडेजाला टीम इंडियात स्थान मिळाले होते.. त्याने या संधीचे सोनं करत धावा काढल्या होत्या. त्याचेच बक्षीस म्हणून वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याला संधी देण्यात आली आहे. इतकेच नाही तर उपकर्णधारपदाची जबाबदारीही अजिंक्य रहाणे याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
18 महिन्यापूर्वी अजिंक्य रहाणे याला संघातून वगळण्यात आले होते. खराब फॉर्ममुळे अजिंक्य रहाणे याने संघातील स्थान गमावले होते. इतकेच नाही तर बीसीसीआयच्या करारातूनही त्याला वगळण्यात आले होते. पण अजिंक्य रहाणे याने हार न मानता दमदार पुनरागमन केले. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणे याने खोऱ्याने धावा काढत टीम इंडियात पुनरागमन केले. त्यानंतर आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याच्याकडे पुन्हा एकदा उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 36 वर्षीय रोहित शर्मा या वर्षाअखेरपर्यंत कसोटीतून निवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळेपुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपपर्यंत टीम इंडियाची कमान अजिंक्य रहाणेकडे सोपवली जाणार का? अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरु आहे.
संजू सॅमसनचे वनडेत पुनरागमन -
विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसन याचेही टीम इंडियात पुनरागमन झालेय. नोव्हेंबर 22 मध्ये संजूने अखेरचा वनडे सामना खेळला होता. संजूला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आलेय. तो संधीचे सोनं करतोय का ? हा येणारा काळच सांगेल.
यशस्वी, ऋतुराजला कसोती स्थान -
वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयनं शुक्रवारी (23 जून) टीम इंडियाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच संघाचं नेतृत्व करेल. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला मात्र कसोटी संघातून वगळण्यात आलं आहे. तर अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली असून त्याच्याकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना प्रथमच कसोटी संघात स्थान मिळालं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी यशस्वी जैस्वालला स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमीला वनडे आणि कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांचंही वनडे संघात पुनरागमन झालं आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड, वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार यांचीही वनडे संघात निवड झाली आहे.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.\
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी वनडे संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.