राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि व्यक्ती त्यानंतर हा विचार सांगणाऱ्या संघटनेतून पुढे आलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या वेळी विदेश दौऱ्यावर जातात, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे भव्य स्वागत होते. तेथील कायदेमंडळात देखील ते कांहीं ठिकाणी भाषणे करतात. त्या त्या देशातील भारतीय नागरिक त्या ठिकाणी जमलेले असतात. विदेशात होत असलेले हे भारतीयत्वाची दर्शन कोणत्याही भारतीयाला सुखावणारे असेच असते याबाबत कोणताच संशय नाही. पण विदेशी भूमीवर घुमणाऱ्या या 'मोदी... मोदी' च्या गजरातून देशाला काय मिळते या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. जगातील फार कमी लोकांना अमेरिकेचा असा शासकीय दौरा अनुभवण्याची संधी मिळते. भारतातून यापूर्वी पहिले राष्ट्रपती एस. राधाकृष्णन आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी असा अमेरिकेचा शासकीय
दौरा केला होता. आज ती संधी नरेंद्र मोदी यांना मिळालेली असल्याने भारतासाठी ते महत्वाचे आहेच, त्यापेक्षाही अधिक मोदी भक्तांसाठी हे छाती फुलविणारे आहे.
भारताच्या आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांच्या कारकिर्दीचा अभ्यास केला तर नरेंद्र मोदींनी केले तेवढे परदेश दौरे इतरांनी कोणी केले असतील असे वाटत नाही.अर्थात पंतप्रधानांनी असे विदेश दौरे करण्यात वावगे काही नाही. उलट जागतिक पटलावर आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी म्हणा किंवा जागतिक जनमत आपल्या बाजूने कायम राहावे यासाठी म्हणा असे दौरे आवश्यक दिसतातही. पण ज्यावेळी पंतप्रधानांचे असे दौरे होतात, त्यावेळी या दौऱ्यांचे फलित म्हणून देशाला काय मिळाले याचा लेखाजोखा देशाला समजणे आवश्यक असते.
मोदींच्या पूर्वी ज्यावेळी कोणी मंत्री किंवा पंतप्रधान विदेश दौरे करीत, त्यावेळी दौऱ्याहून आल्यानंतर ते संसदेला त्या दौ-यांमध्ये काय घडले, त्यातून देशाला काय मिळाले याबाबत अवगत करायचे, तसा संकेत आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये होता. मात्र नरेंद्र मोदींची गोष्टच वेगळी, त्यांना संसदेत फारसे बोलायला आवडत नाही. विरोधकांना विश्वासात घेणे हे तर त्यांच्या गावीही नसते. संसदेत बोलायची वेळ आलीच तर राजकीय अभिनिवेशातून झालेली भाषणे यापेक्षा वेगळे कांहीं मोदींनी संसदेला सांगितल्याचे स्मरत नाही. त्यामुळे इतके विदेश दौरे केल्यानंतरही मोदींनी कधी देशाला, संसदेला या दौऱ्याचे फलित काय याबाबत अधिकृत माहिती दिली नाही.
मोदी सध्या अमेरिकेत आहेत . तेथे त्यांचे भव्य स्वागत होत आहे. मोदी मोदी चा जागर होत आहे असे सारे वृत्त सध्या गोदी मीडियाद्वारे चर्चेत आहे. भारतीय पंतप्रधानांचा विदेशी मातीवर गौरव होत असेल तर ती कोणासाठी देखील निश्चितच आनंदाची गोष्ट आहेच. अर्थात यावेळचा मोदींचा दौरा शासकीय आहे, पण यापूर्वी देखील मोदींनी भव्य स्वागत स्वीकारलेले आहेच. अमेरिकाच कशाला, मोदी जिथे कोठे जातात , तिथे त्यांचा भव्य सत्कार, त्या देशाच्या प्रमुखांनी मोदींबद्दल गौरवोदगार काढणे हे सारे आता नेमिचे झाले आहे. पण एकीकडे मोदींचे हे व्यक्ती महात्म्य वादग्रस्त असले तरी यातून देशाला काय मिळाले? सध्या मोदी अमेरिकेत आहेत, ते करार करीत आहेत, त्यातील बहुतेक करार संरक्षण साहित्यांच्या संदर्भातले आहेत. अमेरिका ही संरक्षण साहित्य निर्मिती मधली मोठी व्यवस्था आहे, आणि या व्यवस्थेला कायम ग्राहक हवे असतात. संरक्षण साहित्याचे ग्राहक म्हणून अमेरिका कधी भारत तर कधी पाकिस्तान किंवा कधी अन्य देशांकडे पाहत असते. त्यामुळे भारतीय पंतप्रधानांचे भव्य स्वागत करून ग्राहक पक्के होणार असतील तर तो धूर्तपणा अमेरिका करणारच. यापलीकडे भारताला या दौऱ्यातून किंवा इतर विदेश दौऱ्यांमधून काय मिळाले हे एकदा स्पष्ट व्हायला हवे.