केंद्र सरकार वीजेच्या दरांसंदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. वीज मंत्रालयाने शुक्रवारी यासंदर्भातील माहिती देताना येणाऱ्या काळात वीजदराच्या नव्या नियमांप्रमाणे दिवसा वीज वापरल्यास कमी बिल आकारलं जाणार आहे. दिवसा आणि रात्रीच्या वीजदरामध्ये मोठा फरक असेल असं सांगण्यात आलं आहे. वीजेच्या दरांमध्ये 20 टक्क्यांचा फरक असणार आहे. म्हणजेच सकाळी होणाऱ्या वीजपुरवठ्यासाठी आकारला जाणारा वीजदर हा 20 टक्के कमी असेल. तर हाच वीजदर रात्रीच्या वेळेस 20 टक्के अधिक असेल. असे नवे दर लागू करण्यासाठी वीज मंत्रालयाकडून कंपन्यांना परवानगी दिली जाणार आहे. मंत्रालयाने हा निर्णय अक्षय ऊर्जेचा वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय वीजमंत्री आर. के. सिंह यांनी अशापद्धतीने वेगवेगळे दर लागू करण्यामागील कारण आणि त्यामुळे होणाऱ्या फायद्यासंदर्भात भाष्य केलं आहे.
वीजपुरवठ्यावरील ताण कमी होणार
नवे नियम लागू केल्यानंतर वीजेचा सर्वाधिक वापर होणाऱ्या तासांमध्ये ग्रीडवर म्हणजेच वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणांवर पडणार भार कमी करण्यास मदत होणार आहे. अनेक भारतीय कुटुंब रात्रीच्या वेळेस एअरकंडीशनचा वापर करतात त्यामुळेच वीजपुरवठ्यावर जो परिणाम होतो तो या नियमांमुळे थोड्याफार प्रमाणात नियंत्रीत करता येईल अशी अपेक्षा आहे.
कधीपासून लागू होणार?
हा नियम एप्रिल 2024 पासून व्यावसायिक आणि औद्योगिक वीज वापरासाठी लागू केला जाणार आहे. त्यानंतर एका वर्षाने कृषी क्षेत्र वगळता सर्वांसाठीच हा नव्या वीजदराचा नियम लागू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
केंद्रीय वीजमंत्री काय म्हणाले?
केंद्रीय वीजमंत्री आर. के. सिंह यांनी, "सौरऊर्जा स्वस्त असल्याने दिवसाच्या वेळी वीजेचा वापर केल्यास कमी पैसे आकारले जातील. याचा फायदा ग्राहकांना होणार आहे," असं म्हटलं आहे. "सायंकाळी किंवा रात्री (नैसर्गिक प्रकाश कमी असेल तेव्हा) थर्मल किंवा हायड्रो पॉवरबरोबर गॅसवर आधारित वीजेचा वापर केला जातो. ही वीज सौरऊर्जेपेक्षा महाग असते. याच ऊर्जेवर अधिक दर आकारला जाणार आहे," असं सिंह यांनी सांगितलं. या निर्णयामध्ये भारताला 2030 पर्यंत जीवाश्म नसलेल्या इंधनाची आपली ऊर्जा क्षमता 65 टक्के आणि 2070 पर्यंत शुद्ध शून्य उत्सर्जन उद्दीष्ट प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत होणार आहे, असं सांगण्यात आलं आहे.