औरंगाबाद - भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज अनाथ, वंचित आणि निराधार बालकांसोबत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
योगा हे एकमेव साधन ज्याने शरीरासह मन आणि आत्मा आपण सुदृढ करू शकतो, योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवा असं आवाहन त्यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करतांना केलं.
छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल येथे बालोन्नती फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित बालगृहातील अनाथ व निराधार बालकांसमवेत पंकजाताई मुंडे यांनी सकाळी जागतिक योग दिवस साजरा केला, त्यावेळी त्या बोलत होत्या. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, प्रवीण घुगे, शिरीष बोराळकर, आयुक्त आस्तिककुमार पांडे आदी यावेळी उपस्थित होते.
सुरवातीला दीप प्रज्वलन करून पंकजाताई मुंडे यांनी योग दिनाचे उदघाटन केले. आयोजकांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, योगा ही आपली संस्कृती नसून शास्त्र आहे, जे जगाने मान्य केलं आहे. शरीरासोबत आत्मिक सुदृढता योगाभ्यास केल्याने येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मूर्तिमंत उदाहरण आहेत जे माणसाच्या शारिरीक, मानसिक आणि आत्मिक शक्तीचा संगम आहे. मी स्वतः नियमित योगाभ्यास करून माझा मणक्याचा त्रास कमी करू शकले. आंतरीक शक्ती जागृत करण्यासाठी लहान वयापासूनच नियमित योगा करा असं आवाहन पंकजाताईंनी यावेळी बालकांना केलं.
याप्रसंगी विविध सामाजिक संस्थासह, शालेय विद्यार्थी, युवक व शहरातील नागरिक देखील मोठ्या उत्साहाने योग दिनात सहभागी होते.