राजकारणात विरोधासाठी विरोध हे सामान्य सूत्र होत असतानाच्या काळात बीड जिल्ह्यात माजी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्यातील बेरजेच्या राजकारणाची चर्चा सध्या सुरु आहे. वैद्यनाथ कारखानाच्या माध्यमातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्याने हे केवळ सहकारापुरते मर्यादित राहणार का मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील राजकारणावर देखील याचे परिणाम होणार हा महत्वाचा विषय आहे. मुळात बीड जिल्ह्यात आणि राज्यातही दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी बेरजेच्या राजकारणावर नेहमी भर दिला. आता या दोन मुंडेसारख्या बेरजेच्या राजकारणातून 'समृद्धी' सामान्यांच्या आयुष्यात येणार की केवळ त्यांच्या राजकारणात हे काळच ठरवेल.
राज्याच्या राजकारणात दिवंगत गोपीनाथ मुंडे मोठे झाले ते बेरजेच्या राजकारणावरच. 'राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो' हे त्यांचे परवलीचे वाक्य असायचे. आणि त्यांचे राजकीय डावपेच देखील तसेच असायचे. त्यामुळेच गोपीनाथ मुंडे राज्यात असो किंवा जिल्ह्यात कोणाशीही जुळवून घेऊ शकायचे. त्यांच्या याच राजकीय शैलीचा त्यांना स्वतःच्या राजकारणात तर उपयोग झालाच, पण जिल्ह्यातही त्यामुळे अनेक नवीन समीकरणे आली. एकेकाळी डबघाईला आलेली जिल्हा बँक त्यांनी महायुतीच्या माध्यमातून ताब्यात घेतल्यानंतर काही वर्ष बँकेने निश्चितच चांगली कामगिरी केली होती. शेतकऱ्यांना कर्ज वाटप करतानाच विद्यार्थ्यांना कर्ज वाटपासाठी पुढाकार घेणारी जिल्हा बँक राज्यातले वेगळे उदाहरण ठरली होती. सक्रिय राजकारणात काहीही होईल, मात्र सहकारी संस्थांमध्ये तरी बेरजेचे राजकारण असावे हे त्यांचे धोरण होते.
दिवंगत गोपीनाथ मुंडे भलेही कायम बेरजेच्या राजकारणाचा पुरस्कार करीत असले आणि प्रसंगी विरोधकांना देखील मदत करीत असले तरी त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून पुढे आलेल्या पंकजा मुंडेंच्या राजकारणाचा पोत मात्र बेरजेच्या राजकारणचा नव्हता. किंबहुना विरोधक म्हणजे जणू शत्रूच अशाच त्यांच्या राजकीय भूमिका बव्हंशी वेळा राहिलेल्या आहेत. विरोधकांना मदत करणे तर दूर त्यांच्या मार्गात अडथळे कसे निर्माण होतात हे 'जय भवानी ' कारखान्याच्या विषयात सर्वांनी पाहिलेले होते. जिल्ह्याचे सोडा, अगदी स्वतःच्या परळी मतदारसंघात देखील त्यांचा आणि धनंजय मुंडेंचा असलेला कट्टर विरोध कायम चर्चेचा विषय असायचा. अर्थात बेरजेच्या राजकारणाला फाटा दिल्याची राजकीय किंमत देखील पंकजा मुंडेंना चुकवावी लागलीच. आता मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे, प्रत्येकाने आपले राजकीय विचार जपावेत, मात्र त्याचवेळी 'मुंडेत्व' देखील जपावे असा सूर लावणारा मोठा वर्ग समोर आला होता. समाजातील 'प्रभावी' गटाने हा सूर लावल्यानंतर त्याचे परिणाम देखील आता दिसू लागले आहेत. अगोदर 'जवाहर' च्या निवडणुकीत धनंजय मुंडेंची झालेली बिनविरोध निवड असेल किंवा आता 'वैद्यनाथ' कारखान्याच्या निवडणुकीत अनेक दिवस अगोदरपासून शस्त्रे परजल्यानंतरही कारखाना बिनविरोध काढण्यास धनंजय मुंडेंनी दाखविलेला हिरवा कंदील असेल, मुंडे बहीण भावांमध्ये किमान काही बाबींवर तरी बेरजेचे राजकारण सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. उद्या यावर दोन्ही बाजूनी 'आम्ही केवळ कारखान्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी एकत्र आलो, याचे राजकीय अर्थ काढू नका' असे सांगितले जाईलही कदाचित, मात्र कारखान्यासाठी का होईना मुंडेंच्या राजकारणात बेरजेला महत्व आले हे ही नसे थोडके. आज वैद्यनाथची अवस्था अत्यंत बिकट आहे. एकेकाळी जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे वैभव असलेला हा साखर कारखाना आज प्रचंड अडचणीत आहे. मुंडे बहीण भावाच्या बेरजेच्या राजकारणातून या किमान या कारखान्याला जरी संजीवनी मिळाली तरी अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्याचे पुन्हा सोने होईल, आणि सहकारात बेरजेचे राजकारण असेच सुरु झाले तर आज मरणासन्न असलेल्या अनेक संस्थांमध्ये पुन्हा जीव येऊन त्यातून खऱ्याअर्थाने सामान्यांच्या आयुष्यात देखील समृद्धी येण्याचे स्वप्न तरी किमान पाहता येईल.
मुंडे बहीण भावाच्या एकत्र येण्याचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम व्हायचे ते होतील, यातून कोणाचा राजकीय फायदा होईल, किंवा जिल्ह्यातील, राज्यातील कोणती समीकरणे खरेच बदलतील का? त्याबद्दल आजच काही बोलणे योग्य होणार नाही, मात्र या बेरजेच्या राजकारणातून जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, कामगार, सामान्यांसाठी कांहीं तरी घडावे इतकीच अपेक्षा