Advertisement

सीबीआयच्या ताब्यातून गायब झाले १०० किलो सोने

प्रजापत्र | Sunday, 13/12/2020
बातमी शेअर करा

दिल्लीः देशातील वेगवेगळ्या गुन्हयांचा तपास करणारी सीबीआयच आता आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. कारण सीबीआयच्या ताब्यातून थोडेथोडके नव्हे तर चक्क १०० किलो सोने गायब झाले आहे. या प्रकरणात आता सीबीआयची चौकशी करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने स्थानिक पोलीसांना दिले आहेत.
                                       २०१२ मध्ये सीबीआयने सुराणा अँड कंपनीवर छापे मारले होते. त्यात तस्करीचे  ४०० किलो सोने जप्त करण्यात आल्याचे पंचनाम्यात म्हटले होते. मात्र या प्रकरणात अंतिम अहवाल सादर करताना सीबीआयने सोन्याचे वजन २९६ किलो असल्याचे म्हटल्याने खळबळ माजली आहे. जप्तीनंतर हे सोने एका locker मध्ये ठेवण्यात आले होते, सीबीआयने ते locker सिल करुन चावी सीबीआय न्यायालयात जमा केली होती. 
आता सोन्याचे वजन १०० किलोने कमी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ माजली आहे. जप्त करतानाच सोन्याचे वजन घेताना काही चुक झाली असावी अशी भूमिका आता सीबीआयने घेतली आहे, मात्र न्यायालयाने ते मान्य केलेले नाही. या प्रकरणात स्थानिक पोलीसांनी चौकशी करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
स्थानिक पोलीसांनी सीबीआयची चौकशी केली तर सीबीआयची बदनामी होईल अशी भूमिका सीबीआयने घेतली, मात्र सीबीआयला काही विशेष अधिकार आहेत आणि स्थानिक पोलीसांकडे क्षमता नाही असे तुम्हाला वाटते का? असा सवाल करत जर तुम्ही स्वच्छ आहात तर तुम्हाला चौकशीची भिती का वाटते असा सवालही न्यायालयाने केला आहे. स्थानिक पोलीसांनी सीबीआयचिच चौकशी करण्याची घटना देशात मागच्या काही दशकात प्रथमच होत असावी.

हेही वाचा 

Advertisement

Advertisement