पुणे - जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याजवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण केलेल्या तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. तिने एमपीएससीतून राज्य वन सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली होती. प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी तिचा करुण अंत झाला आहे. दर्शना दत्तू पवार (वय २६, रा. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव) असं मृत तरुणीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दर्शना पवार गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. अभ्यासासाठी ती अनेकदा पुण्यात येत होती. तिने नुकतीच ‘रेंज फॉरेस्ट ऑफिसर’ (RFO) या पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण केली. तिने मिळवलेल्या यशाबद्दल पुण्यातील खासगी अकादमीने ११ जून रोजी तिच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. यानिमित्त दर्शना ९ जून रोजी पुण्यात आली होती.
दरम्यान, ती पुण्यातील नर्हे परिसरात आपल्या मैत्रिणीबरोबर राहत होती. १२ जून रोजी मैत्रिणीबरोबर सिंहगड किल्ल्यावर जात असल्याचं दर्शनाने आपल्या घरच्यांना सांगितलं. मात्र १२ जूनपासून दर्शना आणि तिची मैत्रीण दोघींच्याही फोनवर संपर्क होत नव्हता. त्यांचा शोध न लागल्याने दोघींच्या कुटुंबीयांनी पुणे शहर पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दर्शना आणि तिच्या मैत्रिणीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार अनुक्रमे सिंहगड आणि वारजे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. चौकशी सुरू केली असता, त्यांचे शेवटचे फोन कॉल लोकेशन वेल्ह्यात सापडले. रविवारी दर्शनाचा मोबाईल वेल्ह्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला, त्यानंतर तिचा मृतदेहही सापडला आहे.
“राजगड किल्ल्याजवळ सापडलेला मृतदेह दर्शना पवारचा असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वेल्हा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दर्शनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दर्शनाचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत सापडल्याचे पोलिसांनी सांगितलं. दर्शनाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. तसेच पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक अद्याप बेपत्ता असलेल्या तिच्या मैत्रिणीचा शोध घेत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेची दखल घेतली आहे. या संपूर्ण मृत्यूप्रकरणात योग्य दिशेनं तपास करून दर्शनाला न्याय द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. सुप्रिया सुळे ट्विटमध्ये म्हणाल्या, “एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या दर्शना पवार या मुलीचा मृतदेह किल्ले राजगडाच्या पायथ्याशी सापडला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी ही घटना घडली, हे अतिशय खेदजनक आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलीसांनी योग्य दिशेने तपास करुन दर्शनाला न्याय द्यावा.”