Advertisement

निवृत्त शिक्षकाचे घर फोडून सात तोळे सोने लंपास

प्रजापत्र | Sunday, 18/06/2023
बातमी शेअर करा

 

 

बीड - शहरातल्या शिवाजी विद्यालयासमोर असलेल्या नूतन कॉलनीत अज्ञात चोरट्याने निवृत्त शिक्षकाचे घर फोडून घरामधील तब्बल सात तोळे सोन्यासह अन्य किमती साहित्य चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.१८) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणाची माहिती शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आल्या आल्यानंतर घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस डेरेदाखल झाले. श्वानपथकासह ठसे तज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. निवृत्त शिक्षक कुटुंब गेल्या दोन दिवसांपूर्वी बाहेरगावी गेलं याचा फायदा चोरट्यांनी उचलला. बीड शहरातल्या शिवाजी विद्यालयासमोर असलेल्या नूतन कॉलनीमध्ये जाधव वैजिनाथ धर्माजी हे निवृत्त शिक्षक आपल्या कुटुंबियासमवेत राहतात. ते गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी कार्यक्रमानिमित्त घर बंद करून बाहेरगावी गेले होते. रविवारी सकाळी शिक्षक आपल्या कुटुंबियासमवेत घरी आले, कुलूप उघडून घरात गेले तर घरामध्ये सर्व साहित्य अस्ताव्यस्त दिसून आलं. घराचा दरवाजा कुलूपबंद असताना नेमकं काय घडलं, हे पहात असतानाच घराच्या पाठीमागील गेटचे कुलूप तुटलेले आणि पाठीमागील दरवाज्याचे कडीकोंडा तुटलेले दिसून आले तेव्हा संबंधित शिक्षकाने शिवाजीनगर पोलिसात या घटनेची माहिती दिली. घटनास्थळावर तात्काळ शिवाजीनगर पोलिसांनी जावून घटनास्थळ पंचनामा केला. त्यावेळी प्रथमदर्शी सात तोळे सोन्यासह अन्य किमती सामान चोरट्यांनी चोरून नेले. पाच ते सात लाख रुपयांची चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज काढला जात असून घटनास्थळावर श्वानपथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आल्याचे सांगण्यात येते. ही चोरी गेल्या तीन दिवसांच्या कालखंडात नेमकी केव्हा घडली हे मात्र समजू शकले नाही. चोरट्यांनी घरामधील कपाट तोडले, कपाटामधील मुलींच्या दागिण्यांसह अन्य दागिने चोरून नेले.

 

Advertisement

Advertisement