बीड दि. १७ : बीड नगरपालिकेने कर्ज न फेडल्याने द्वारकादास मंत्री बँकेने नगरपालिकेच्या नाट्यगृहाचा ताबा घेताच नगरपालिकेने बँकेसमोर नांग्या टाकल्या आहेत. शुक्रवारी बँकेने नाट्यगृह ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी नगरपालिकेने लगेच बँकेत १ कोटी ४ लाखांचा भरणा केला. यामुळे मंत्री बँकेने नाट्यगृह जप्तीची कारवाई मागे घेतली.
बीड नगरपालिकेला द्वारकादास मंत्री बँकेने २००६ मध्ये नाट्यगृह उभारणीसाठी कर्ज दिले होते. त्यानंतर काही काळ नगरपालिकेने कर्जफेड केली, मात्र मागच्या दहा वर्षांपासून पालिकेकडे बँकेचे कर्ज थकले होते. बँकेने सदर कर्जाच्या वसुलीसाठी अनेक प्रयत्न केले, मात्र नगरपालिकेने प्रतिसाद देखील दिला नव्हता.त्यामुळे शुक्रवारी मंत्री बँकेने नगरपालिकेच्या नाट्यगृहाचाच सरफेसी कायद्याखाली ताबा घेतला होता. यामुळे बीड नगरपालिकेची पुरती नाचक्की झाली होती.
अखेर राज्यभरात नाचक्की झाल्यानंतर शनिवारी नगरपालिकेने बँकेच्या कर्जाची परतफेड केली. पालिकेने बँकेत तब्बल १ कोटी ४ लाखांचा भरणा केला. त्यामुळे आता नाट्यगृह पुन्हा मुक्त झाले आहे. मात्र नगरपालिकेला कर्जाची परतफेड करायची होती तर नाट्यगृहावर जप्ती येण्याची वाट नगरपालिकेचे प्रशासन का पाहत होते ? बीड शहराचे वैभव असलेल्या वास्तूचे धिंडवडे निघण्याची वेळ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी का आणली या प्रश्नाची उत्तरे अनुत्तरित आहेत.
प्रजापत्र | Saturday, 17/06/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा