Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - तुझं माझं जमेना, अन ....

प्रजापत्र | Saturday, 17/06/2023
बातमी शेअर करा

राजकारणात अनेकदा अनेक गोष्टी अपरिहार्यता म्हणून घडतात, पण त्या अपरिहार्यतेला राजकीय पर्याय बनविणे अवघड असते, ते टिकविणे तर त्याहून अवघड असते. केंद्रात आणीबाणीनंतर झालेला जनता सरकारचा प्रयोग असेल किंवा महाराष्ट्रातील अगोदरचा वसंतदादा पाटलांच्या सरकारचा किंवा त्यानंतरच्या पुलोद, अशा आघाड्या फार काळ टिकत नाहीत हे राजकीय वास्तव आहे. असे असताना आता भाजपसारख्या मोठ्या पक्षाच्या पाठिंब्यावर अवघे ५० आमदार सोबत असलेल्या शिंदेंचे मुख्यमंत्रीपद कितीकाळ स्थैर असेल हे सांगणे अवघड आहे. त्यामुळेच आता सरकारमधील खदखद बाहेर येत आहे. अर्थात भाजपला जोवर शिंदेंना वापरायचे आहे तोवर भाजपवाले सारं काही खपवून घेतील मात्र आजची सरकारची अवस्था 'तुझं माझं जमेना' पेक्षा वेगळी नाही.

 


 

 

देशाच्या राजकारणात आणीबाणी नंतर जे बदल घडले त्यात जनता सरकार हा मोठा बदल होता. वेगवेगळी विचारधारा, सारे काही वेगळे, केवळ काँग्रेस नको म्हणून हे एकत्र आले. लोकांनी भरभरून दिले देखील, मात्र या सरकारला अस्थिर केले ते अंतर्गत विरोधानेच. केंद्रात हे होत असतानाच राज्यात काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे सरकार आले. काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते. मात्र या सरकारमध्ये एक वाक्यता कधीच नव्हती. अगदी वसंतदादांच्या काठीचा आधार घेऊन चालण्यावर देखील नासिकराव तिरपुडे अश्लाघ्य टीका करायचे. 'आमचे सरकार काठी टेकत टेकत चालले आहे' असे तिरपुडे जाहीर बोलायचे. त्यामुळे हे सरकार देखील अंतर्गत विरोधामुळेच गेले. त्यानंतर शरद पवारांनी पुलोदचा प्रयोग केला, मात्र नंतरच्या काळात पुलोद देखील टिकले नाही. म्हणजे केवळ सत्ता मिळवायची म्हणून जे काही एकत्रीकरण केले जाते , त्याला दीर्घकालीन भवितव्य नसते हेच या साऱ्या अनुभवांमधून लक्षात घेण्यासारखे आहे.
या इतिहासाची आठवण करण्याचे आजचे कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रात शिंदे- फडणवीसांच्या डबल इंजिन सरकारचे जे काही चालले आहे ते अशाच अंतर्विरोधांची आठवण करून देणारे आहे. भाजपला शिवसेनेला धडा शिकवायचा होता, म्हणून त्यांनी भलेही शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिले असेल, मात्र हे आमचे उपकार आहेत हीच भावना कायम शिंदेंवर बिंबविण्याची एकही संधी भाजप सोडत नाही, किमान राज्यातील भाजपचे वेत्ये सोडत नाहीत. मागच्या चार दिवसात या सरकारच्या संदर्भाने जे काही जाहिरात युद्ध झाले आणि त्यातून बैल ते बेडूक असा झालेला प्रवास असेल किंवा १०५ मोठे का ५० असा विचारला गेलेला प्रश्न असेल, भाजपच्या मनातली भावनाच यातून समोर आलेली आहे. आता फडणवीसांना डिवचणारी पहिली जाहिरात नेमकी कोणी दिली हा संशोधनाचा विषय असला तरी राज्यातील सरकारमध्ये सारे काही आलबेल नाही हे मात्र प्रकर्षाने समोर आले आहेच.
मात्र असे असले आणि यातून शिंदे फडणवीसांच्या मैत्रीच्या अब्रूची लक्तरे पार राज्याच्या वेशीवर टांगली गेली असली तरी , या दोघानांही आज तरी सत्ता सुटत नाही. भाजपच्या नेतृर्त्वाने भलेही शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना वगळण्याचे निर्देश दिले असतील, पण  तानाजी सावंतांसारख्या व्यक्तीला हात लावण्याची हिम्मत एकनाथ शिंदे खरेच दाखवू शकतील का  हा भल्याभल्यांना पडलेला प्रश्न आहे . त्यामुळेच एकमेकांवरचे आरोप काय किंवा एकमेकांच्या गाफ़ील अडविणे काय, कितीही त्रास झाला तरी सत्तेची खुर्ची दोघांनाही सोबतच उबवायची आहे. 

 

Advertisement

Advertisement