Advertisement

नर्मदा जिनींगला आग लागून लाखोंचे नुकसान

प्रजापत्र | Friday, 16/06/2023
बातमी शेअर करा

किल्लेधारुर दि.१६ (प्रतिनिधी) - तेलगाव परळी राज्यमार्गावर भोपा येथील नर्मदा कोटेक्स जिनींगला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून जिनिंगमधील कापसासह कांही मशिनरी जळाल्या. यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले. दरम्यान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली. आग आटोक्यात आणण्यासाठी तेलगाव कारखाना, धारूर, माजलगाव येथील अग्निशमन दल आले होते.

       तेलगाव ते परळी महामार्गावर भोपा ता.धारूर येथे धारूर येथील उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांच्या नर्मदा उद्योग समुहाची नर्मदा कोटेक्स जिनींग आहे. येथे सध्या शेतकऱ्यांचा कापुस खरेदी केली जात आहे. शुक्रवारी दुपारी या नर्मदा जिनींगला अचानक आग लागली. ही बाब तेथे काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी जिनिंग व्यवस्थापक शंकर चौरे यांना सांगितली. त्यावर त्यांनी लगेच मजुर, कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने जिनिंग मधील अग्निशमन डब्ब्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करत तेलगाव येथील लोकनेते सोळंके कारखान्याच्या अग्निशमन दलास माहिती देत ते बोलावून घेतले. तसेच माजलगाव व धारूर या दोन्ही नगर परिषदच्या अग्निशमन दलास पाचारण केले. कडक उन्हाचा पारा असल्याने आगीच्या ज्वाला भडकत आग पसरत होती. मात्र जिनिंगमधील मजुर, कर्मचारी यांनी शर्थीचा प्रयत्न करत वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. परंतु आगीचा भडका जास्त होता त्यामुळे या आगीत जवळपास चारशे क्विंटल कापूस जळाल्याचा अंदाज आहे. तर कापूस आतमध्ये नेण्यासाठी वापरण्यात येत असलेले दोन हार्डबाॅक्स पट्टयांसह जळाले. यामुळे या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. ही आग कशामुळे लागली याचे कारण समजु शकले नाही.

Advertisement

Advertisement