Advertisement

बोगस बियाण्यांचे रॅकेट, साठेबाजी,नफेखोरीवर तात्काळ कारवाई करा

प्रजापत्र | Friday, 16/06/2023
बातमी शेअर करा

बीड - खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाण्यांची राज्यभरात होत असलेली विक्री, लोकप्रिय बियाण्यांची आणि खतांची साठेबाजी तसेच दुकानदारांकडून सुरू असलेली नफेखोरी यावर आळा घालण्याबाबत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी निवेदनाद्वारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्य कृषी आयुक्तांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यात बोगस बियाणे ब्रँडेड कंपन्यांचे नाव वापरून विक्री केले जाण्याचे अनेक प्रकार घडत असून यावर शासनाचे नियंत्रण नाही, त्याचबरोबर कापसाच्या कबड्डी तसेच सोयाबीनच्या महाबीज 71 यासारख्या लोकप्रिय बियाण्यांची अधिकच्या आणि चढ्या भावाने दुकानदार विक्री करतात. याद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक तसेच फसवणूक केली जात असल्याची तक्रार धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्र्यांना गुरुवारी पत्राद्वारे केली होती. 

यावर नियंत्रण मिळवण्यासाठी धडक कारवाया आणि धाडसत्रे राबवण्यात यावेत, यासाठी अधिकची विशेष पथके नेमावीत यासह विविध उपाययोजना करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्र्यांना पत्र लिहिले होते. याची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ दखल घेतली आहे.

धनंजय मुंडे यांनी निवेदनात केलेल्या मागणीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्य कृषी आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे आता खत आणि बियाण्यांची विक्री सुरळीत होईल, अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.

खरीप हंगामाच्या तोंडावर मराठवाड्यात काही क्षेत्रात पाऊस झाला तर काही क्षेत्रांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे परंतु शेतकरी वर्गात सोयाबीन कपाशी यासह विविध बियाणे खरेदी करण्याबाबत लगबग सुरू आहे. याचाच फायदा घेऊन अनेक प्रकारचे बोगस बियाणे राज्यभरात बाजारात आणून प्रसिद्ध ब्रँडची नावे वापरून, चढ्या भावाने विक्री केली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. 

Advertisement

Advertisement