Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - शेतीसमोर आव्हान

प्रजापत्र | Friday, 16/06/2023
बातमी शेअर करा

यावर्षीचे मान्सूनचे सारेच अंदाज चुकू लागले आहेत. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊस उशीरा येईल असे भाकित केले जात होते, मात्र नंतरच्या काळात शासनाच्या हवामान विभागाने किंवा हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्यासारख्यानी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येईल आणि जून अखेरपर्यंत पेरण्या होतील असे सांगितल्याने यावर्षीच्या खरिपाबाबत सामान्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र आता अर्धा जून उलटला असून अजूनतरी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस झालेलाच नाही. बिपरजॉय चक्रीवादळामुळे तर परिस्थिती अधिकच गंभीर होताना दिसत असून, हे महाराष्ट्राच्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

 

मान्सूनने यावर्षी सर्वांचेच, सारेच अंदाज चुकविले आहेत. अगदी सरकारी हवामान खात्यापासून ते पंजाब डख यांच्यासारखे हवामान अभ्यासक असतील किंवा सहदेव भाडोळी चे परंपरागत भाकित, मान्सून कधी सक्रीय होणार याबद्दल कोणालाच काहीच सांगता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अगोदर अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनसाठी आवश्यक असणारी पोषक स्थिती निर्माण होण्यात आलेले अडथळे आणि आता मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर धडकला असताना अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय हे चक्री वादळ, या बिपरजॉयमुळे सामान्य शेतकऱ्यांच्या जगण्यातला जॉय मात्र निघून जाईल काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. खरीप हंगाम सुरु झालेला आहे. साधारणतः आपल्याकडील कापूस, तूर, कडधान्ये (यात मूग, उडीद ), सोयाबीन या पिकांचा विचार केल्यास जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी सुरु झाली पाहिजे असे अपेक्षित आहे. आता जूनचा तिसरा आठवडा सुरू आहे, आणखी एक आठवडा तरी पेरणी सुरु होईल, किंवा पेरणीयोग्य पाऊस येईल अशी परिस्थिती नाही, त्यामुळे साहजिकच मूग, उडीद यांचा विषय संपलेला असेल. कापूस, सोयाबीन या पिकांच्या बाबतीत आणखी १५ दिवस पेरणी लांबली तरी चालू शकेल अशी परिस्थिती असली तरी उशीर झालेल्या पेरणीचा नंतर उत्पादनावर परिणाम होतोच आणि पुढची गणिते देखील बिघडतात.
      बीड जिल्ह्यात काही अपवाद वगळता साधारणतः जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस होतो, मात्र मागच्या तीन चार वर्षात हे चित्र बदलले होते, यावर्षी पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होईल असे वाटत आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे. त्यातच बिपरजॉयमुळे मान्सूनच्या हवेतील बाष्प कमी होत असल्याचा अंदाज आहे. म्हणजे बाष्पयुक्त वारे तयार व्हायला आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. याचा अर्थच यंदाचा खरीप हंगाम फारसा चांगला राहिलं अशी परिस्थिती नाही. मात्र सरकार पातळीवर याचा कितपत विचार होत आहे हे सांगता येणे अवघड आहे. अल निनोच्या प्रभावामुळे पावसाळा लांबेल म्हणून राज्याच्या मुख्य सचिवांनी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या दृष्टीने बैठक घेऊन पूर्वतयारी केली होती, मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने काय? शेतकऱ्यांसमोर असे संकट उभे असलेले दिसत असताना सरकार मधील मंत्री मात्र जाहिरातबाजीत आणि कोण अधिक लोकप्रिय हे दाखविण्यात मग्न आहेत. त्यांना सरकारमध्ये कोण मोठे हे दाखविण्यात अधिक रस आहे, त्यामुळे खरिपासमोर काय संकट येऊ शकते याबद्दल ना कृषीमंत्री बोलतात, ना उपमुख्यमंत्री ना मुख्यमंत्री.
     खरिपाचा हंगाम लांबला तर काय? अशावेळी पीक पद्धतीमध्ये काही बदल करावे लागतील का? यासाठी शेतकऱ्यांची जागृती करण्यासाठी कृषी विभाग कांहीं करणार आहे का? एकतर कापसाचे भाव कोसळल्यामुळे मागच्या वर्षीचा अर्धा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात आहे, सोयाबीनने देखील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केलेला आहे, अशात आता यावर्षी खरीप लांबला तर शेतकऱ्यांच्या हातात पुन्हा पैसे नेमका येणार कधी याचाही विचार होणे आवश्यक आहे. याचा अर्थ आजच हातून खूप काही निसटले आहे असे म्हणायचे नाही, किंवा भीतीदायक वातावरण देखील निर्माण करायचे नाही, मात्र येऊ घातलेल्या संभाव्य अडचणींच्या बाबतीत सरकारच्या पातळीवरची उदासीनता गंभीर आहे, आणि लोकप्रतिनिधींनी याबाबतीत अधिक सक्रिय होणे आवश्यक आहे. मुळात सरकारच्या प्राधान्याचे विषय वेगळे आहेत, त्यांना शेती आणि शेतक-यांशी देणेघेणे नसले तरी विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी तरी लवकर जागे होऊन सुस्तपणा सोडून सरकारला या विषयांवर विचार करायला भाग पाडणे अपेक्षित आहे.

Advertisement

Advertisement