परळी - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने पुण्यात आजपासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमिअर लीग (MPL) मध्ये मराठवाड्याची छत्रपती संभाजी किंग्स ही टीम सहभागी होत आहे. या टीममध्ये मराठवाड्यातील तब्बल 12 खेळाडूंचा समावेश आहे.
आ.धनंजय मुंडे यांच्या वेंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स संघाने या स्पर्धेत भाग घेतला आहे. मराठवाड्यातल्या जास्तीत जास्त प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळावी या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी खेळाडूंच्या लिलावात सहभागी होऊन मराठवाड्यातील जास्तीत जास्त खेळाडू आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्न केले.
या संघाचा आयकॉन प्लेयर असलेला धाराशिवचा राजवर्धन हंगरकेर हा वेगवान गोलंदाज असून, तो नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये धोनीच्या सीएसके संघाकडून खेळला आहे. त्याचबरोबर इंडिया अंडर नाइंटिन संघात विश्वचशक देखील खेळलेला आहे.
या खेळाडूंचा आहे समावेश
याच संघात जालन्याचा वेगवान गोलंदाज रामेश्वर दौंड आणि ऑल राउंडर आकाश जाधव यांचाही समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यातील डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहसीन सय्यद, संभाजी नगरचा डावखुरा स्पिनर ऋषीकेश नायर, नांदेड चा लेग स्पिनर स्वराज चव्हाण, रणजीपटू सामसुजा काझी, संभाजी नगरचा ट्वेन्टी ट्वेन्टी स्पेशालिस्ट आनंद ठेंगे, उजव्या हाताचा फलंदाज स्वप्नील चव्हाण, बीडचा विकेट किपर बॅट्समन सौरभ नवले, धाराशिवचा मिडल ऑर्डर बॅट्समन अभिषेक पवार, ऋषीकेश दौंड या मराठवाड्यातल्या खेळाडूंचा समावेश आहे.