अकोला - माजी पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यात प्रहार जनशक्ती पक्ष बळकट करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. प्रहारच्या अकोला जिल्ह्यातील पहिल्या जिल्हा परिषद सभापती ठरलेल्या स्मृती गावंडे यांचे पती निखील गावंडे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोट तालुका प्रमुख तुषार पाचकोर तसेच संजय बुध यांनी सहकाऱ्यांसह ता.१५ जून रोजी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
वंचितच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा जाहीर प्रवेश झाला. प्रहार जनशक्ती पक्षाने अकोट विधानसभा मतदारसंघावरच अधिक लक्ष केंद्रीत केले असताना प्रहारचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे, तालुका प्रमुख तुषार पाचकोर तसेच जिल्हा अध्यक्ष प्रहार शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख संजय बुध, ग्रा. पं. लोतखेळ उपसरपंच विशाल नागरे यांनी वंचितमध्ये प्रवेश केल्याने प्रहारला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. (Marathi Tajya Batmya)
पक्ष प्रवेश करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा ओबीसी नेते ॲड. संतोष रहाटे, बंटी पाटील गावंडे, हिरा सरकटे व सचिन सरकटे आदी मान्यंवर उपस्थित होते.
‘वंचित’ला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी दिले होते सभापतीपद
अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला होता. त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाकडून स्मृती गावंडे यांना सभापतीपद देवून वंचितवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून झाला होता. त्यानंतर प्रहार व वंचित यांच्यात अनेक आरोप-पत्यारोपाच्या फेरीही झडल्या होत्या. आता त्याच सभापतींचे पतीने वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतल्याने प्रहारला मोठा धक्का बसला आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघातच फुट
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे हे अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसघातून आमगानी निवडणुकीसाठी तयारी करीत आहेत. त्याच मतदारसंघात ‘प्रहार’मध्ये फुट पडल्याने पक्ष नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.