देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे पाऊस तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. भारताच्या किनारपट्टीच्या राज्यांमध्ये बिपरजॉय चक्रीवादळामुळं हवामानात मोठे बदल झाले आहेत. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप सुरू आहे. त्याचबरोबर केरळ आणि आंध्र प्रदेशात मान्सून दाखल झाला असून, अनेक राज्यात पाऊस पडत आहे.
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील लोकांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. गुरुवारी (15 जून) राष्ट्रीय राजधानीत कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस असू शकते. आज दिल्लीत हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. आज उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होऊ शकते. दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात रात्री हलका पाऊस पडला आहे. पाऊस पडला असला तरी दिल्लीतील लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला नाही. पुढील दोन दिवस पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं तापमानात एक ते दोन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बिपरजॉय चक्रीवादळामुळं राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची घोषणा केली आहे. राजस्थानमधील अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळाचा सर्वात मोठा धोका गुजरातला आहे. त्यामुळं गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच अनेक गावे रिकामी करण्यात आली आहेत. केरळ, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळं महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, पुढील एका आठवडा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही. हवामान खात्यानुसार, गोवा, गुजरात, लक्षद्वीप, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि अंदमान-निकोबार, सिक्कीममध्ये पाऊस पडू शकतो. याशिवाय उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे.
उष्णतेचा इशारा
उत्तर प्रदेशसोबतच बिहार, झारखंड, ओडिशामध्येही तापमानात सातत्याने वाढ होत आहे. ओडिशामध्ये काल कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.