Advertisement

नाराजी नाही तर 'या' कारणामुळे सगळे दौरे रद्द

प्रजापत्र | Wednesday, 14/06/2023
बातमी शेअर करा

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या टॅगलाईनखाली आज राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी याबाबत सारवासारव करायला सुरूवात केली असताना भाजप नेत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज काही बाहेरचे दौरे ठरले होते. हेच सगळे दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे ते मोठ्या सभा आणि विमान प्रवास फडणवीस टाळत आहेत. यामुळे त्यांनी फक्त सह्याद्री अतिथीगृहावर बैठका आयोजित केल्या आहेत. आजची अकोल्याची सभा आणि उद्याच्या धारशिवमधील सभेला देवेंद्र फडणवीस जाणार नाहीत. विमानप्रवास टाळण्यासाठी दोन्ही सभा रद्द करण्यात आलेल्या आहेत.

कानाचा त्रास होऊ लागल्यामुळे विमान प्रवास करू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे ते काल कोल्हापूर येथील कार्यक्रमाला गेले नव्हते. आज अकोला येथे जाहीर सभा होती त्या सभेला ते जाणार नाहीत. उद्या धारशिव येथे सभेलाही ते जाणार नाहीत. तर आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठका आयोजित केल्या आहेत. याबाबतची माहीती 'एबीपी माझा'ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

तर जाहिरात प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबतची माहीती दिली आहे.

 

 

जाहिरात प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

राज्यातील जनतेने एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून मला आणि देवेंद्र फडणवीसांना पसंती दिली आहे. त्यामुळे आम्ही आणखी जोमाने काम करू. या कामाचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आम्ही पाठवलेले प्रस्ताव मंजूर करतात म्हणून विकासाचे प्रकल्प जोरात, जोमात आणि वेगात पुढे जात आहेत. शिवसेना-भाजप युती ही बाळासाहेबांच्या विचाराने झाली आहे. ही एक वैचारिक युती असून, स्वार्थ, खुर्ची आणि मला काहीतरी मिळेल यासाठी झाली नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेअंतर्गत आयोजित कार्यक्रमासाठी काल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस कोल्हापुरात जाणार होते. मात्र डॉक्टरांनी कानाची काळजी घ्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाला जाणे रद्द केले, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

 

‘जाहिराती’वरून जुंपली

मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी कोणताही उल्लेख झाला नसला तरी बंद दरवाजाआड शिंदे आणि फडणवीस यांच्यात काहीतरी चर्चा झाल्याचे समजते. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ही जाहिरात जारी करून शिवसेनेने आमच्या भावना दुखावल्याचे सांगितले.

फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केल्यानेच शिंदे मुख्यमंत्री झाले असेही ते म्हणाले. येत्या १९ जूनला शिवसेनेचा वर्धापनदिन असून यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन आखले आहे.

Advertisement

Advertisement