शिंदेंच्या शिवसेनेने एक जाहिरात प्रसिद्ध करून राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता कशी अधिक आहे, आणि दिल्लीचे आशीर्वाद शिंदेंना कसे आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे मंत्रिमंडळातील एकनाथ शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना वगळण्याचे निर्देश भाजप हायकमांडने दिल्याची शहा -शिंदे -फडणवीस बैठकीतील चर्चा थेट माध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने ही जाहिरात करावी यातच शिंदे फडणवीसांमध्ये नेमके काय सुरु आहे हे लक्षात येऊ शकते. आजपर्यंत आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना नमविण्यासाठी किंवा अडचणीत आणण्यासाठी फडणवीस कावा करीत होते, आता शिंदे तोच खेळ तर खेळत नाहीत ना? असे वाटावे अशी परिस्थिती आहे. अखेर 'चिंगारी का खेल बहोत बुरा होता है। औरोके घर जलाने का सपना अपनेही घर खरा होता है।' असेच फडणवीसांच्या बाबतीत म्हणावे लागू नये म्हणजे मिळविले
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा म्हणून फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने शिवसेना फोडायचा खेळ तर खेळला, मात्र हा खेळ आपल्या अंगलट येईल असे त्यांना वाटलेही नसावे. राजकारणात प्रत्येक व्यक्तीची उपयुक्तता एकसारखी कायम कधीच राहत नसते. पूर्वी 'खास ' असणारा माणूस कधी 'आम' होईल हे सांगताच येत नाही. तीच अवस्था सध्या देवेंद्र फडणवीसांची झाली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे एकेकाळचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाडके. अत्यंत जवळचे, इतके की महाराष्ट्रात फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी थेट 'आज का देवेंद्र, कल का नरेंद्र' म्हणायला सुरुवात केली. बरे दिल्लीने देखील अनेक वर्ष तसे होऊ दिलेच ना, महाराष्ट्रात देवेंद्र म्हणतील तीच पूर्व दिशा असेच होत गेले. पण देवेंद्र जर नरेंद्र बनणार असतील तर अमित शाह सारख्यांनी करायचे काय?, म्हणूनच दिल्लीच्या दरबारी राजकारणातूनच देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्याचे अभियान सोयीस्करपणे सुरु झाले आणि त्यासाठी दिल्लीने मोहरा निवडला तो देखील देवेंद्र फडणवीसांनी शोधलेलाच .
ज्या एकनाथ शिंदेंना वापरून भाजपने महाराष्ट्राच्या शिवसेनेची शकले पाडली आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारला चूड लावली त्याच शिंदेंच्या सरकारमध्ये सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांची इच्छा नसताना त्यांना उपमुख्यमंत्रीपद पक्षाने घ्यायला लावले. स्वतःच्याच ठाण्यात दुय्यम फौजदार होणे काय असते याचा अनुभव सध्या देवेंद्र फडणवीस घेत आहेतच. त्यातच त्यांना वाटले होते इतके एकनाथ शिंदे काही कच्चे निघाले नाहीत, भाजपची कोंडी नेमकी कोठे करायची याचा अनुभव शिंदेंनाही चांगला आलेला म्हणून अगदी देवेंद्र फडणवीसांकडून आलेल्या फाईल देखील मुख्यमंत्री कार्यालयात अडवल्या जाऊ शकतात हे शिंदेंनी दाखवून दिले. त्यातच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारासाठी अमित शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक बैठक झाली. या बैठकीत म्हणे शिंदेंच्या गटाच्या काही मंत्र्यांना हटविण्याचे निर्देश भाजपच्या नेतृत्वाने दिले. आता हे निर्देश दिले का नाही हे खरेतर तिघांनाच माहित असायला हवे होते, मात्र ही बातमी संजय राऊतांच्या माध्यमातून माध्यमांमध्ये आली. यावरून एकनाथ शिंदेंची गोची होणे स्वाभाविक आहे. कारण शिंदेंसोबत जे लोक आले ते अर्थातच कोणत्या तरी लोभापायीच आले आहेत आणि त्यांच्याबद्दलचे निर्णय देखील भाजप घेणार असेल तर या लोकांना एकनाथ शिंदेनी उत्तर ते काय द्यायचे? मुळात या मंत्र्यांच्या संर्भाने जी काही चर्चा मोजक्याच लोकांमध्ये झाली ती बाहेर येते कशी? हे सारे एकनाथ शिंदेंना समजणार नाही असेही नाही. म्हणूनच शिंदेंच्या शिवसेनेने थेट जाहिरात करून राज्यात एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षाही अधिक लोकप्रिय कसे आहेत असे सांगावे हा निव्वळ योगायोग तर असूच शकत नाही. एकीकडे भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये शिंदे सेनेचे पानिपत होणार आणि याचा फटका भाजपलाही बसणार असे समोर येत असतानाच शिवसेनेने समोर मांडलेला हा सर्व्हे झाला कधी? हे कोडेच आहे. आणि त्यातही नरेंद्र मोदींनंतर महाराष्ट्रात शिंदेनाच लोकप्रियता आहे हे फडणवीसांना खिजविणारेच आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे तसे मुरलेले राजकारणी आहेत. ते काही एका दिवसात मोठे झालेले नक्कीच नाहीत. राज्यात मुंडे महाजनांची आणि नागपुरात गडकरींची चलती असतानाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी दुय्यम भूमिका आणि अपेक्षाही सहन केलेली आहेच. त्यामुळे फडणवीस राजकारणात अनेक टक्के टोणपे खाऊन आलेले आहेत. मात्र नंतरच्या काळात , विशेषतः मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांमध्ये जो एक सत्तेचा आणि मोदींच्या जवळकीचा दर्प वारंवार दिसायला लागला त्यातून त्यांनी स्नेह हितशत्रू देखील निर्माण केले आहेत. जरा कोणी स्पर्धक वाटायला लागला तर त्याचे खच्चीकरण करण्यासाठी जे डाव फडणवीस खेळायचे, तीच 'चिंगारी' आज इतरांच्या हातचे कोलीत बनेल असा विचार देखील फडणवीसांनी केला नसावा.