बीड दि.12 (प्रतिनिधी): जानेवारी मध्ये मुदत संपलेल्या आणि निवडणूका प्रलंबित असलेल्या राज्यातील 2216 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील 186 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत होणार आहे. 21 जून रोजी ही आरक्षण सोडत काढली जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यानुसार राज्यातील 2216 ग्रामपंचायतींमध्ये प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता ओबीसी आरक्षणासह आरक्षण सोडत काढली जाणार आहे. समर्पित आयोगाने ओबीसींसाठी निश्चित केलेल्या जागांच्या प्रमाणात ही आरक्षण सोडत काढली जाणार असून यात बीड जिल्ह्यातील 186 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 21 जून रोजी ही आरक्षण सोडत काढली जाईल तर हरकती आणि आक्षेपानंतर 12 जुलै रोजी याची अंतिम अधिसूचना निघणार आहे. यामुळे आता या गावांमधील ग्रामपंचायत निवडणूकीचे वातावरण तापायला सुरूवात होईल.
असा आहे कार्यक्रम
विशेष ग्रामसभेची सूचना -16 जून
ग्रामसभेत आरक्षण सोडत -21 जून
प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करणे-22 जून
हरकती आणि सूचना दाखल करणे-23 ते 30 जून
हरकतींवर उपविभागीय अधिकार्यांचे अभिप्राय-6 जुलै
जिल्हाधिकार्यांनी अंतिम अधिसूचना काढणे-7 जुलै