आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज शनिवारी दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली असून, भाविकांच्या स्वागतासाठी देहूकर सज्ज झाले आहेत.
पालखी प्रस्थाननिमित्त देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराची रंगरंगोटी, विविधरंगी पुष्प सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पालखीचा देहूबाहेरील पहिला मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात असणार आहे. या ठिकाणीही पालिकेच्यावतीने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पालिकेच्यावतीने अधिकाऱ्यांच्या १२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते प्रत्येक २०० मीटर अंतरावर देखरेख करणार आहेत. मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
आकुर्डी येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पालिकेने नियंत्रण कक्ष उभारला आहे. दिंड्यांच्या मुक्कामासाठी शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी स्वतंत्र समन्वयक नियुक्त केले आहेत. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये, स्नानगृहांची व्यवस्था केली आहे. वैद्यकीय सुविधा, औषधे यांच्यासह मार्गावर फिरती रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. वैद्यकीय पथकामध्ये स्त्री रोग तज्ज्ञांची नेमणूक केली आहे.
प्रस्थान कार्यक्रम रुपरेषा
पहाटे ५ : श्री विठ्ठल-रुक्मिणी व शिळा मंदिरात महापूजा
पहाटे ५.३० : तपोनिधी नारायण महाराज समाधी पूजा
सकाळी ९ : संत तुकाराम महाराज पादुका पूजा
सकाळी १० : प्रस्थान सोहळा व काल्याचे कीर्तन
दुपारी २ : प्रस्थान सोहळा
सायंकाळी ५ : मुख्य मंदिर प्रदक्षिणा
सायंकाळी ६.३० : पालखी मुक्काम, इनामदार वाडा
दरम्यान, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज देहूतून होणार आहे. दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान उद्या आळंदी येथून होईल. राज्यभरात आषाढी वारीच्या निमित्तानं उत्साहाचं वातावरण आहे. वारकरी देहू आणि आळंदीत दाखल झाले आहेत. तर, यापूर्वीच काही दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत.