Advertisement

दोन तपांमध्ये जिल्ह्यात आक्रसली राष्ट्रवादी

प्रजापत्र | Saturday, 10/06/2023
बातमी शेअर करा

संजय मालाणी

बीड - 1999 ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यातील जे लोक त्यांच्यासोबत आले होते, त्यातील किती नेते आज पक्षासोबत आहेत हा राष्ट्रवादीने आत्मचिंतन करावा असा विषय आहेच. त्यासोबतच मागच्या 24 वर्षात जिल्ह्यातील राष्ट्रवादीची शक्ती वाढण्याऐवजी कमी होत आहे. पक्षाची अनेक धोरणे देखील त्याला तितकीच जबाबदार आहेत. स्थानिक नेतृत्वात कायम धुसफूस सुरु राहील अशी व्यवस्था वरिष्ठ नेत्यांनीच जिल्ह्यात करून  ठेवली आणि एकेकाळी शरद पवारांचा बालेकिल्ला असलेला जिल्हा राष्ट्रवादीच्या हातून केव्हा निसटला हे देखील कळले नाही असे चित्र आहे.

1999 ला ज्यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती,त्यापूर्वी महाराष्ट्रात राजकीय वारे कसेही वाहत असले तरी बीड जिल्हा मात्र ठामपणे शरद पवार जिथे असतील तिथे उभा राहायचा असा अनुभव होता.त्यामुळे शरद पवारांवर प्रेम करणारा जिल्हा हीच बीडची ओळख होती. त्यामुळेच राष्ट्रवादीला बीड जिल्ह्याकडून आणि बीड जिल्ह्याला राष्ट्रवादीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र मागच्या 24 वर्षाच्या कालखंडात ना राष्ट्रवादीला जिल्ह्यातून पाहिजे ते मिळाले ना जिल्हा वासियांच्या अपेक्षा राष्ट्रवादीकडून पूर्ण झाल्या. खरेतर या 24 वर्षांच्या काळात राष्ट्रवादीचा विस्तार व्हायला हवा होता, मात्र राष्ट्रवादी जिल्ह्यात आक्रसत असल्याचेच चित्र आहे.
राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळी बीडमधून केशरकाकू क्षीरसागर, गेवराईतून शिवाजीराव पंडित , केजमधून विमल मुंदडा यांच्यासोबतच आडसकर आणि इतर मोठी नावे राष्ट्रवादीसोबत म्हणण्यापेक्षाही शरद पवारांसोबत गेली होती. मात्र नंतरच्या काळात लगेच शिवाजीराव पंडित पक्षापासून बराच काळ दुरावले. एकेकाळचे पवारांचे साथीदार असलेल्या सुंदरराव सोळंके , शिवाजीराव पंडित यांच्या राजकीय वारसदारांना आमदार होण्यासाठी मात्र भाजपात जावे लागले. आता पंडित आणि सोळंके कुटुंब पुन्हा राष्ट्रवादीसोबत आहेत, मात्र इतरांचे काय?

जयदत्त क्षीरसागर असतील किंवा केजचे मुंदडा कुटुंब , यांना राष्ट्रवादीमध्ये आपले भवितव्य दिसले नाही, राष्ट्रवादीच्या तिकिटावर ज्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली ते रमेश आडसकर असतील किंवा सुरेश धस हे आज राष्ट्रवादीसोबत नाहीत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर 2009 मध्ये राष्ट्रवादीने सहा पैकी 5 आमदार निवडणून आणले होते, त्यातील प्रकाश सोळंके वगळता कोणीच आज राष्ट्रवादीमध्ये नाहीत. एकेकाळी जिल्ह्यातील अनेक संस्थांवर राष्ट्रवादीचा दबदबा होता, आज ते चित्र नाहीत. 2004 नंतर लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीला एकदाही जिंकता आली नाही. बीड जिल्ह्यात आजही शरद पवारांच्या मागे जाणारा मोठा वर्ग आहे, शरद पवारांची क्रेझ आहे, मात्र संघटनात्मक बांधणीच्या बाबतीत जिल्ह्यात राष्ट्रवादी कमी पडली. त्यामुळे एखादा नेता पक्षाच्या प्रवाहातून बाजूला झाला की त्याचा परिणाम थेट पक्षाच्या विस्तारावर होतो हेच दिसून आले. अपवाद म्हणून 2019 च्या निवडणुकीत बीड आणि आष्टीचे उदाहरण देता येईल, मात्र हे अपवादच . हे सोडले तर आजही पक्ष नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा दबाव नाही, तर जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे असणारे कार्यकर्ते हे कोणत्या तरी नेत्याचे आहेत , उद्या त्या नेत्यांनी वेगळा विचार करायचा म्हटले की याचा थेट परिणाम पक्षावर होतो. 24 वर्षाच्या प्रवासात स्वतःची संघटनात्मक ताकत  पक्षाला वाढविता आली ठामपणे म्हणता येणार नाही.
आजघडीला धनंजय मुंडे , संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके , बाळासाहेब आजबे हे चार आमदार ही 2009 नंतरची सर्वात चांगली परिस्थिती आहे हे मान्य केले, तरी आजघडीला सर्वात अस्थिर पक्ष म्हणून देखील राष्ट्रवादीकडे पहिले जाते, अजित पवार काही निर्णय घेणार म्हटले की जिल्ह्यातील कार्यकर्ते अस्वस्थ होतात, आ. सोळंके अधून मधून कोणाला तरी भेटत असतात असे सारे खेळ सुरु असल्याने 24 वर्षात राष्ट्रवादीच्या बाबतीत केवळ अस्वस्थता वाढल्याचेच चित्र आहे.

Advertisement

Advertisement