अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या तरुणाने ट्विटरवरून पवारांना धमकी दिली. तेव्हापासून सौरभ पिंपळकरचा पोलीस शोध घेत आहेत.
शहरातील साईनगर भागात राहणारा २६ वर्षीय सौरभ हा भाजपाचा कार्यकर्ता आहे. त्याच्या टि्वटर अकाउंटवर त्याने ‘आय ॲम बीजेपी ॲक्टिव्हिस्ट, आय हेट सेक्यूलेरिझम’ असे लिहून ठेवले आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सौरभ पिंपळकरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गाडगेनगर पोलिसांचे पथक त्याच्या शोधात आहे. हे पथक त्याच्या घरीही जाऊन आले, पण तो आढळून आला नाही, त्याचा मोबाईलदेखील बंद आहे.
या प्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत. अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. सौरभ पिंपळकरचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतची काही छायाचित्रे आता समाज माध्यमावर प्रसारित होऊ लागली आहेत. येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील कॉपी प्रकरणात भाजपाचा माजी नगरसेवक प्रणीत सोनी याच्यासह सौरभ हा सहआरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.