बीड दि. ७ (प्रतिनिधी ) : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव प्रभागातून निवडणून आल्यानंतरही मुदतीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दणका दिला असून बीड जिल्ह्यातील तब्बल २१४ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्र्व रद्द केले आहे. हे सदस्य २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडणून आले होते. यात काही सरपंचांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडणून आल्यानंतर १२ महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक करण्यात आले होते. २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये राखीव जागांवरून निवडणून आलेल्या उमेदवारांना कोरोनामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही या सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. वारंवार संधी देऊनही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याचा अहवाल स्थानिक तहसीलदारांनी दिल्यानंतर जिल्हाधिकरी दीपा मुधोळ मुंडे यांनी जिल्ह्यातील तब्बल २१४ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याचा निर्णय दिला आहे. बीड जिल्ह्यात एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत सदस्य अपात्र होण्याची ही जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर आता अनेक ग्रामपंचायतींमधील सत्तेचे गणित देखील बदलणार आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
अपात्र सदस्यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1UJyonfvc8_p_9QLuYoFLzsA_EMCg6gVQ/view?usp=drivesdk