अहमदाबाद - गुजरातचे प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट गौरव गांधी यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. ते ४१ वर्षांचे होते. वैद्यकीय कारकिर्दीत त्यांनी १६ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन त्यांना नवं आयुष्य दिलं. बुधवारी सकाळी कुटुंबीय त्यांना उठवण्यासाठी गेले. त्यावेळी डॉ. गौरव गांधी गंभीर अवस्थेत सापडले. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून वैद्यकीय वर्तुळाला धक्का बसला आहे.
डॉ. गौरव गांधी गुजरातमधील प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट होते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे ते रुग्णांना तपासून घरी आले. कुटुंबियांसोबत जेवल्यानंतर झोपायला गेले. कुटुंबातील सदस्य त्यांना सकाळी झोपेतून उठवण्यास गेले. त्यावेळी गौरव गांधींची प्रकृती गंभीर होती. त्यांना लगेचच जी. जी. रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. गौरव गांधी जामनगरमधील बडोदा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये मुख्य कार्डियोलॉजिस्ट म्हणून कार्यरत होते.
घरी पोहोचल्यानंतर दोन तासांनी डॉ. गांधी बाथरुमजवळ पडले. डॉ. गांधींनी जी. जी रुग्णालयातील एमर्जन्सी वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. रुग्णालयात नेल्यानंतर ४५ मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. डॉ. गांधी यांच्या पत्नी देवांशी या दंतचिकित्सक आहेत. प्रजासत्ताकदिनी डॉ. गौरव गांधी यांचा वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबाद्दल सत्कार करण्यात आला.
डॉ. गौरव गांधींचं वैद्यकीय शिक्षण जामनगरमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी अहमदाबादमधून कार्डियोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन केलं. मग ते जामनगरला परतले. तिथेच त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. देशभरात हृदयविकारांच्या झटक्यांनी होत असलेल्या मृत्यूंविरोधात फेसबुक सुरू करण्यात आलेल्या अभियानात त्यांचा सक्रिय सहभाग होता. हृदयविकारापासून स्वत:चा बचाव करण्याच्या पद्धती ते सर्वसामान्यांना शिकवायचे.