चौसाळा - एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात चार वेळा अनुत्तीर्ण झाल्याच्या नैराश्यातून आकाश संतोष जोगदंड (रा.चौसाळा, जि. बीड) या तरुणाने सोलापुरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सावरकर मैदानाजवळील एका हॉटेलच्या खोलीत सोमवारी (दि.५) रोजी हा प्रकार उघडकीस आला
सोलापूर येथील डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आकाशने २०२० मध्ये प्रवेश घेतला होता. एप्रिल- मेमध्ये प्रथम वर्षातील शेवटची संधी असलेली परीक्षा देऊन तो गावी गेला. मेच्या शेवटच्या आठवड्यात निकाला लागला. या चौथ्या संधीतही तो अनुत्तीर्ण झाला. त्यामुळे आकाश नैराश्यात होता. चार ते पाच दिवसांपूर्वी तो गावाकडून सोलापुरात आला, मात्र कॉलेजच्या होस्टेलमध्ये गेला नाही. हॉटेलमध्ये राहिला. मित्र फोन करत होते, तेव्हा तो गावी असल्याचे सांगत होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली, त्यात ‘आईच्या विश्वासाला पात्र ठरलो नाही, आई काळजी घे, बहिणीचा नीट संभाळ कर. माझ्या मृत्यूची वार्ता अगोदर माझे मामा व मित्रांना द्या. कारण आई व बहिणीला धक्का बसेल. माझ्या मृत्यूस कुणालाही जबाबदार धरू नये,’ असे आकाशने मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले होेते. त्याच चिठ्ठीत मामा व मित्रांचे संपर्क क्रमांक दिले. गळफास घेण्यापूर्वी तोंडाला कागद, त्यावर चिकटपट्टी लावली. गळ्याला नायलॉनचा दोर रुतू नये यासाठी रुमालही लावला होता. हॉटेलच्या खोलीतील लोखंडी हुकाला दोरी बांधून त्याने गळफास घेतला. सोमवारी सकाळी बराच वेळ झाला तरी आकाश खोलीच्या बाहेर आला नाही म्हणून हॉटेलचालकांनी पोलिसांनी माहिती दिली. मयत आकाश हा एकुलता एक होता, त्याच्या मागे वडील व आई, बहिण असा परिवार आहे.
परीक्षेची पाचवी संधी मिळू शकली असती
एनएमसीच्या नियमानुसार मेडिलकमध्ये चार वेळा नापास झाल्यास प्रवेश रद्द केला जातो. या धास्तीमुळे आकाश तणावात होता.मात्र दोन दिवसांपूर्वी एनएमसीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला होता. त्यानुसार, पाचव्यांदाही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. पण कदाचित नव्या नियमांचे माहिती नसल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे अशी चर्चा वर्गमित्रांमध्ये होती.