बीड/ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून (दि.४)-जिल्ह्यात रविवारी (दि.४) दिवसभरात वीज अंगावर पडून दोन बैल,एक म्हैस आणि एका शेतकऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे.याशिवाय वादळी वाऱ्यामुळे जिल्हावासियांची दिवसभर चांगलीच दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले.विशेष म्हणजे आष्टी तालुक्यातील अनेकांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेले होते.याशिवाय खरवंडीच्या टोलनाक्याचे ही सुसाट वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले.टोलप्लाजावरील पत्रे या वाऱ्याने पूर्णपणे आडवे झाले होते.
बीड जिल्ह्यात रविवारी (दि.४) वादळी वारे आणि विजेच्या गडगडाट सर्वत्र ऐकण्यास मिळाला.शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात वादळी वारे आणि विजेच्या घटना अधिक प्रमाणात घडल्या.रविवारी दुपारी आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे कोसोदूर उडून गेली होती.तर रस्त्यावरून नागरीकांना या वाऱ्यामुळे चालणेही अवघड झाले होते.नागरिकांच्या घरा-घरात बाहेरची वाळू आत आल्याचे पाहायला मिळाले.तसेच आष्टीपाठोपाठ बीड शहरांतही वादळी वाऱ्याने नागरिकांच्या अडचणी वाढविल्या होत्या.या वाऱ्याचा अनेक ठिकाणी फटका सहन करावा लागला होता.याशिवाय परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील देविदास दगडू फड यांचा बैल वीज पडून ठार झाला.तसेच मौजे म्हसोबाचीवाडी (तालुका आष्टी) येथील पोपट आश्रुबा ढाकणे यांचा एक बैल व पटटीवडगाव सज्जमध्ये मुर्ती येथील गोविंद प्रभु दराडे (गट २१३) यांची विजेमुळे एका म्हैस दगावल्याची घटना समोर आली. दरम्यान जनावरांसोबत विजेमुळे मनुष्यहानी देखील झाल्याचे पाहायला मिळाले.सायंकाळच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील भरत गणपती मुंडे (वय-६०) यांचा वीज अंगावर पडल्याने होरपळून मृत्यु झाला होता.दरम्यान दिवसभर वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटाने नागरिक मेटाकुटीला आले होते.
टोलनाक्याची प्रचंड हानी
दरम्यान वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले असताना पाथर्डी-बीड राष्ट्रीय महामार्गावरील खरवंडी येथील टोलनाक्यालाही या वाऱ्यांचा मोठा फटका सहन करावा लागला.सुसाट वाऱ्यामुळे टोलवरील पत्रे पूर्णपणे आडवे झाल्याचे पाहायला मिळाले.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.