Advertisement

पंकजा मुंडेंची अस्वस्थता , पण दखल घेतंय कोण ?

प्रजापत्र | Friday, 02/06/2023
बातमी शेअर करा

संजय मालाणी

राजकारणात अनेकदा इशारे देऊन देखील पक्षावर दबाव आणता येतो,मात्र केवळ इशाऱ्यावर राजकारण चालत नसते.त्यातही ज्यावेळी एकाच व्यक्तीच्या करिष्म्यावर पक्ष चालविता येतो असा हटवादी अहंकार ज्या पक्षाला आलेला असतो, त्या पक्षाच्या बाबतीत तर फुकाचे इशारे काहीच कामाचे नसतात.माजी मंत्री पंकजा मुंडेंना हे माहित नाही असेही नाही, तरीही त्या अधूनमधून आपली नाराजी जाहीर करण्यासाठी म्हणा किंवा पक्षाने दखल घ्यावी म्हणून म्हणा,आपली अस्वस्थता व्यक्त करीत असतात.मात्र पंकजा कोठे जाऊच शकत नाहीत असे भाजपने गृहीत धरलेले असल्याने पंकजा अस्वस्थ असल्यातरी त्याची दखल घेतंय कोण ?

 

महाराष्ट्राच्या माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडेंनी अहिल्या देवीच्या जयंतीच्यानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना 'मी भाजपमध्ये आहे, मात्र भाजप माझा पक्ष नाही' आणि 'बापाच्या पक्षात नाही जमले तर भावाचा पक्ष आहेच' असे विधान केले आहे. पंकजा मुंडेंच्या या विधानाला तसा फार मोठा अर्थ आहे. मात्र या विधानावर भाजपने 'पंकजा मुंडेंच्या विधानाचा विपर्यास केला गेला' अशी भूमिका घेतली आहे. स्वतः पंकजा याबद्दल काहीच बोलल्या नाहीत आणि आता बोलणारही नाहीत.उद्या कदाचित 'भाजप हा कोण्या एका व्यक्तीचा पक्ष नाही म्हणून पंकजा असे बोलल्या असतील' अशी मखलाशी भाजपकडून केली जाईलही,मात्र या साऱ्या प्रकारातून पंकजा मुंडेंची अस्वस्थतेचं पुन्हा एकदा दिसून आली आहे.
असेही विधानसभा निवडणुकीच्या अगोदर (२०१९) महाजानदेश यात्रेदरम्यान बीडमध्ये घडलेल्या मानापमान नाट्यानंतर भाजपने पंकजा मुंडेंना अनेकदा डावलले,पंकजा मुंडेंच्या पराभवामध्ये त्यांचा स्वतःचा स्वभाव बऱ्यापैकी कारणीभूत असेलही मात्र यात भाजपचा हात नव्हता असे कोणीच म्हणणार नाही. त्यानंतरही पंकजा मुंडेंच्या विरोधात त्या ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्या समाजातून पर्याय निर्माण करण्याचे झालेले प्रयत्न असतील किंवा प्रत्येकवेळी पंकजा मुंडेंना बाजूला करणे असेल, पंकजा मुंडेंनी अस्वस्थ व्हावे असेच भाजप वागत आला आहे.पंकजा मुंडेंनी देखील अनेकदा ही अस्वस्थता व्यक्त केली, खरेतर ज्या भाजपसाठी मुंडेंनी खूप काही केले, त्या भाजपमध्ये पंकजा मुंडेंना मिळणारी वागणूक पाहता त्यांनी मागेच पक्ष सोडायला हवा होता, मात्र 'हा पक्ष माझ्या बापाचा आहे'असे म्हणत पंकजा मुंडे आतापर्यंत बळेच आणि जबरदस्तीचे का होईना नाते 'निभवित' आल्या आहेत. आणि कदाचित त्यामुळेच काहीही झाले तरी भाजप ही पंकजा मुंडेंची गरज आहे असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्के समजून घेतले आहे. त्यांनी पंकजा मुंडेंना गृहीत धरलेले असल्यामुळे असेल किंवा मागच्या काळात आपण मैदान हरवल्याची एक अनामिक भीती देखील कदाचित पंकजा मुंडेंना असावी, मात्र पंकजा मुंडे केवळ पक्षाला इशारे देऊ शकतात,आदळआपट करू शकतात, पण पक्षाला धक्का देऊ शकत नाहीत असे भाजपला वाटत असल्यानेच पंकजा मुंडेंच्या अस्वस्थतेची दखल भाजप फारशी घेत नाही.

Advertisement

Advertisement