Advertisement

पैसे नसल्याने रुग्णवाहिकेत डिझेल भरायला नकार

प्रजापत्र | Thursday, 01/06/2023
बातमी शेअर करा

 चंद्रपूर : रुग्णवाहिकेत डिझेल भरायला पैसे नसल्याने गर्भवती महिला तासभर पेट्रोल पंपावर अडकली होती. चंद्रपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील धाबा आरोग्य केंद्राची ही  रुग्णवाहिका होती. आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सोडणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

 

 

एकीकडे शासन आरोग्य व्यवस्थेवर हजारो कोटींची घोषणा अर्थसंकल्पात करत आहे. त्यासाठी तरतुदही केली जात आहे.  मात्र, चक्क रुग्णवाहिकेत डिझेल टाकण्यासाठी पैसे नसल्याने गर्भवती महिला तब्बल एक तास पेट्रोल पंपावर अडकल्याचा धक्कादायक प्रकार गोंडपिपरी तालुक्यात घडला.

 

 

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला. या आरोग्य केंद्रात तीन एमबीबीएस वैधकीय अधिकारी आहेत. धाबा येथील गर्भवती महिलेला त्रास जाणवायला लागला. प्रकृती गंभीर असल्याने योग्य उपचार व्हावा यासाठी तिला चंद्रपूर येथे पाठवण्यात आले. 

 

 

धाबा आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका निघाली. गोंडपिपरी येथील पेट्रोल पंपावर त्यांचा नियमित व्यवहार सुरू असतो. मात्र, डिझेलचे पैसे वेळेवर न मिळाल्याने उधारीवर डिझेल टाकण्यासाठी पंपचालकाने नकार दिला. रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याने पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी तब्बल एक तास लागला. 

 

 

यादरम्यान गर्भवती महिलेसह रुग्णवाहिका पेट्रोल पंपावर अडकून राहिली. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पैशाची व्यवस्था केल्यानंतर रुग्णवाहिका चंद्रपूरसाठी रवाना झाली. जननी सुरक्षा योजना,जननी शिशु सुरक्षा योजना अशा अनेक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध असतांना नियोजन नसल्याने गर्भवती महिलेचा जीव आरोग्य विभागाने धोक्यात टाकला. या घटनेविषयी तालुक्यातील नागरिकांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.कर्तव्यावर कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

Advertisement

Advertisement