देशात मान्सून दाखल होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. हवामान खात्याने आज राज्यासह देशाच्या बहुतेक भागात मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवली केली आहे. भारतीय हवामान खात्याने संपूर्ण दिल्ली आणि लगतच्या परिसरात भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच महाराष्ट्रातही मान्सून पूर्व पावसाची हजेरी लागण्याच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाचा अंदाज
मुंबई, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांशिवाय इतर सर्व जिल्ह्यांमध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राजधानी दिल्लीत पहाटे पावसाला सुरुवात
देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. आज, 31 मे रोजी पहाटे दिल्लीच्या काही भागात पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीत 4 जूनपर्यंत हवामान स्वच्छ राहील, तर बिहार, झारखंड, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये पावसामुळे तापमानात घट होईल.
कुठे ऊन, कुठे पाऊस
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांच्या स्थिरतेनंतर नैऋत्य मान्सून यावेळी बंगालच्या उपसागरात पोहोचला आहे. मान्सून आता वेगाने पुढे सरकत आहे, त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. महाराष्ट्रातही कधी पाऊस पडतो तर कधी कडक ऊन पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. राज्यासह देशात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता
मुंबई आणि त्याच्या लगतच्या किनारी भागातील लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. तर येत्या 24 तासांत मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने रायगड, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, अमरावती, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम येथे पावसाची शक्यता वतवली आहे. यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबादच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बीड आणि जालना वगळता इतर जिल्ह्यांसाठीही 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.