जामखेड -बळीराजावर कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकट असतंच. या सगळ्यातून सावरत तो पुन्हा उभा राहातो. पण त्याच्या हाती कवडीमोल भाव येतो. शेतकऱ्यांसाठी भाजीपाल्याचे दर कितीही कमी झाले, तरी व्यापारी त्यांची कमाई सोडत नाहीत. त्यामुळेच स्मार्ट सिटीच्या शहरी भागात भाज्यांचे दर कायम वाढलेले असतात. मात्र जामखेड शहरात भाजी विकण्यासाठी ३० किलोमीटरवरून आलेल्या एका शेतकऱ्याने रुपयाला एक जुडीप्रमाणे मेथीची विक्री केली. मात्र, त्याला दुचाकीच्या पेट्रोलपुरतेही पैसे उरले नाहीत.
निदान पेट्रोलपुरते तरी पैसे निघतील, या आशेवर तो बाजारात आला होता. मात्र १ रुपयाप्रमाणे मेथीला भाव मिळाला. त्यामुळे कृषी प्रधान असलेल्या देशात शेतकऱ्यांची याहून बिकट परिस्थिती ती काय, असा सवाल करण्यात येत आहे.
जामखेडच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर मेथीच्या जुडीची आवक होत आहे. मागणीपेक्षा भाजीची आवक जास्त होत असल्याने मेथी मातीमोल झाली आहे.सध्या बाजारात १ ते २ रुपये प्रतिजुडी दर मिळत आहे. किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांनाही शेतकऱ्यांनी एक रुपयाला मेथीची जुडी विकली. मेथीसारखीच कोथिंबीर, पालक, शेपू व फळभाज्यांची अवस्था झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कष्टाने पिकवलेल्या भाज्या मातीमोल दराने विकाव्या लागत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.तालुक्यातील ३० किमी वरील जवळा परिसरातून भल्या पहाटे शेतकरी भाजी मंडईमध्ये मेथी विकण्यासाठी आला होता. मात्र काही तास थांबूनही ग्राहक किंवा व्यापाऱ्यांकडून खरेदी होत नव्हती. भाज्यांची प्रचंड आवक असल्याने परत गावी माल घेवून जाणे परवडणारे नव्हते. त्यामुळे मिळेल त्या भावात भाजीपाला विकून जाणे त्यांनी ठरवले. निदान पेट्रोलपुरते तरी पैसे निघतील, या आशेवर १ रुपयाला मेथी घेऊन जा, अशी विनवणी केली. मेथी जुडी बाजारात १ रुपयाला देखील घ्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
१०० ते १२५ जुडी असलेले मेथीचे गाठोडे १०० रुपयांत विक्री करून हताश शेतकरी गावाकडे परतला. आलेल्या पैशातून दुचाकीच्या पेट्रोलचाही खर्च हाती पडत नव्हता. केलेल्या कष्टाची भरपाई कशी मिळणार. शेतमाल पिकविताना पडणारे कष्ट, उत्पादन खर्च आणि मिळणारा दर, याचा ताळमेळ लागत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतमालाच्या दराकडे लक्ष वेधणे क्रमप्राप्त आहे.
हेही वाचा