बेस्ट कराराअंतर्गत 400 कर्मचार्यांची झाली होती नियुक्ती
बीड : मुंबईची लोकल सेवा बंद असल्याने राज्य परिवहन महामंडळ आणि बेस्टमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी एक करार करण्यात आला. या कराराअंतर्गत राज्यातून 1 हजार बसेस मुंबईत सेवेसाठी दाखल झाल्या होत्या. यात बीडमधून 100 बस आणि 400 कर्मचारी गेले होते. एक महिन्यानंतर आता बीड जिल्ह्यातून केवळ 100 कर्मचारी बेस्ट करारांअंतर्गत सेवा देण्यासाठी मुंबईत असून 300 कर्मचार्यांची घरवापसी झाली आहे. दरम्यानच्या काळात 134 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले होते.
बीड जिल्ह्यातून मुंबईला सुरूवातीला 400 कर्मचारी आणि 100 बसेस सेवा देण्यासाठी गेल्यानंतर याला जिल्ह्यातून कडाडून विरोध झाला. कारण मुंबईला सेवा देण्यासाठी गेलेले कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह येत होते.यावर लोकप्रतिनिधी, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आवाज उठविला होता.पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात मुंबईहून सेवा बजावून आलेल्या कर्मचार्यांचे पॉझिटिव्हचे प्रमाण तसे मोठे होते. बीडच्या कर्मचार्यांना मुंबईत पाठवू नका अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे जयदत्त क्षीरसागर यांनी केली होती.तसेच इंटक आणि कामगार संघटेनच्या वतीने सांगली प्रमाणे बीडमधील ही कर्मचारी परत बोलवा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला होता.जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा लागल्यानंतर एसटी कर्मचार्यांमुळे कोरोना पुन्हा शिखर गाठणार असे सांगण्यात येत होते.अवघ्या एक महिन्याच्या आतच सव्वाशे कर्मचारी बाधित झाले होते. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच तापला होता.अखेर आता मुंबईला केवळ 100 कर्मचारीच सेवा बजावण्यासाठी राहिले असून 300 कर्मचार्यांची घरवापसी झाली आहे. यात 50 वाहक आणि 50 चालक यांचा सहभाग असून सात दिवसाला मुंबईत ते सेवा बजावून परत येतात.आणि यानंतर दुसरी टीम मुंबईत दाखल होते.
ग्रामीण भागात सुरू होणार लवकरच बस
जिल्ह्यातील 300 कर्मचार्यांची घरवापसी झाली असली तरी ग्रामीण भागात आज फारशा बस सुरू नाहीत ग्रामीण प्रवाशांच वाढता कल पाहता त्याठिकाणी बस फेर्या सुरू करण्याचे नियोजन असल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले. टप्प्या टप्प्याने या बस फेर्या जिल्ह्यातील सर्व भागात सुरू करण्यात येणार असून वाढत्या मागणीनुसार बस खेड्या पाड्यात सुरू होतील असे ते म्हणाले.
कर्मचारी आले मात्र बस तेथेच
दरम्यान 300 कर्मचार्यांची जरी बीड जिल्ह्यात वापसी झाली असली तरी बीडच्या 100 बसेस मात्र मुंबईतच आहेत. त्यामुळे कर्मचारी आले मात्र बस तिथेच असल्याचे चित्र आहे. याचा जिल्ह्याच्या बस वाहतुकीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून येते.आगामी काळात या बसेस जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आणखी चांगल्या पद्धतीने बस सेवा प्रवाशांना मिळू शकते.कदाचित यासाठी आणखी 1 महिना वाट पाहावी लागेल असा अंदाज आहे.
पॉझिटिव्हचे प्रमाण मोठे मात्र मृत्युदर शून्य
दरम्यान एसटी कर्मचार्यांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण मोठे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे एकाही कर्मचार्याला कोरोनामुळे स्वत:चे प्राण गमवावे लागले नाही. पहिल्या तीन टप्यानंतर कर्मचार्याचे पॉझिटिव्हचे प्रमाण मोठे होते. मात्र चौथ्या टप्प्यानंतर पॉझिटिव्हचे प्रमाण घटू लागल्याचे दिसून आले.
हेही वाचा