नवी दिल्ली - भारतीय नौदलानं नवी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रात्रीच्या अंधारात लढाऊ मिग २९ के या विमानाचं भर समुद्रात विमानवाहू नौकेवर लँडिंग झालं. रात्रीच्या किरर्र अंधारात यशस्वीरित्या केलेल्या या कामगिरीमुळं नौदलाच्या कामगिरीत मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नौदलाच्या माहितीनुसार, INS विक्रांत या विमानवाहून युद्ध नौकेवर MIG 29K हे लढाऊ विमान यशस्वीरित्या लँड झालं. आत्मनिर्भर भारताच्या अभियानानुसार ही नौदलाची मोठी कामगिरी असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यानं या ऐतिहासिक लँडिंगचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
नौदलानं यापूर्वीच जाहीर केलं होतं की, भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहून नौका INS विक्रांतवर रात्रीच्यावेळी विमान उतरवणं हे आव्हान होतं. पण यशस्वी ठरलेली ही कामगिरी INS विक्रांतवरील क्रू मेंबर्सची तसेच नेव्हल पायलट्सच्या प्रशिक्षित, उच्च व्यावसायिकता वाखाणन्याजोगी आहे. शनिवारी मिग 29K या लढाऊ नौकेवर उतरलं. कारवार येथील नेव्हल बेसवर ही नौका तैनात होती.
दरम्यान, गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारताच्या पहिल्या स्वदेशी INS विक्रांत या युद्धनौकेचं लोकार्पण झालं होतं. ४०,००० टनपेक्षा अधिक वजन वाहून नेण्याची क्षमता असलेल्या सर्वाधिक सक्षम युद्धनौकांच्या यादीत INS विक्रांतचा समावेश झाला आहे.