Advertisement

वेतनासाठी महिला कामगार आक्रमक

प्रजापत्र | Thursday, 25/05/2023
बातमी शेअर करा

बीड - येथील नगरपालिकेतील रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचे तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. याच वेतनासाठी महिन्यापूर्वी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले होते. त्यानंतरही आजपर्यंत वेतन न मिळाल्याने गुरुवारी दुपारी महिला कामगार आक्रमक झाल्या. तळपत्या उन्हात आंदोलन करत त्यांनी पालिकेच्या गेटला पुन्हा एकदा कुलूप लावून ५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोंडले. तसेच मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यामुळेच वेतन मिळत नसल्याचा आरोप करत बोंबा मारल्या.

 

बीड शहरातील स्वच्छतेची जबाबदारी खासगी कंत्राटदाराला देण्यात आलेली आहे. परंतु त्यांना पालिका वेळेवर बिल देत नाही, त्यामुळे आमचे पगार वेळेवर होत नाहीत. याच मुद्द्यावर ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती. तेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी महिनाभरात प्रकरण निकाली काढू, असे अश्वासन दिले होते. परंतु सीईओंकडून आश्वासन पूर्ण न झाल्याने गुरुवारी महिला कामगार आक्रमक झाल्या. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांनी अचानक पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. त्यामुळे पालिकेचे जवळपास ५० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यालयातच अडकले. शिवाय विविध कामांसाठी पालिकेत गेलेले सामान्य नागरिकही अडकून पडले होते. या प्रकारानंतर पाेलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली, परंतु आतील लोक बाहेर काढण्यात त्यांनाही यश आले नाही. महिलांनी जोपर्यंत वेतन होत नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा घेतला होता.

 

Advertisement

Advertisement