छ.संभाजीनगर - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर (Samruddhi ExpressWay) संभाजी नगर येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे चौघे भाऊ काकांच्या अंत्यविधीच्यासाठी गेले होते. परत येताना वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. एकाच वेळी चौघा भावांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रीनिवास गौड (वय 38 वर्षे), कृष्णा गौड ( वय 39 वर्षे), संजीव गौड ( वय 46 वर्षे) आणि सुरेश गौड ( वय 39 वर्षे) अशी या चार मृत भावंडांची नावे आहेत. भार्गव गौड ( वय 18 वर्षे) हा तरुण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ही सर्व जण सुरत गुजरात राज्यातील रहिवाशी आहे.
समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील वरझडी शिवारात बुधवारी त्यांच्या ईरटीगा (GJ 05 RN 8450) कारला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळेस वाहन भरधाव वेगात कार चालवत असताना चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. करमाड पोलीस ठाण्याचे पोनी मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोना विजय जारवल, सुभाष भाकरे हे पुढील तपास करीत आहे.