Advertisement

सुवर्णवेधी नीरज पुन्हा अव्वल

प्रजापत्र | Tuesday, 23/05/2023
बातमी शेअर करा

भारताचा सुवर्णवीर नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आता भालाफेकच्या (Javelin Throw) क्रमवारीत नंबर 1 खेळाडू बनला आहे. सोमवारी (22 मे) त्याने ही कामगिरी केली. दरम्यान, जागतिक अॅथलेटिक्सनं नवी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक रँकिंगमध्ये नंबर-1 बनला आहे. या भारतीय स्टारनं पहिल्यांदाच हे मानांकन मिळवून इतिहास रचला आहे. 

 

जागतिक अॅथलेटिक्सच्या ताज्या क्रमवारीनुसार, नीरज चोप्राचे सध्या 1455 गुण आहेत, जे सध्याच्या जगज्जेत्या अँडरसन पीटर्सपेक्षा 22 गुणांनी अधिक आहेत. भालफेकच्या जागतिक क्रमवारीत नीरजनं ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सला मागे टाकलं असून अँडरसनचे सध्या 1433 गुण आहेत. टॉप-5 रँकिंगमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीमही आहे.

 

जागतिक क्रमवारीत नीरज आणि अँडरसननंतर झेक प्रजासत्ताकचा जेकोब वडलेच तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांचे 1416 गुण आहेत. चौथ्या क्रमांकावर जर्मनीचा ज्युलियन वेबर असून त्याचे सध्या 1385 गुण आहेत. तर चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचा अर्शद नदीम आहे, ज्याचे 1306 गुण आहेत. नीरज आणि अर्शद यांच्यात गुणांमध्ये खूप अंतर आहे.

 

 

नीरज चोप्रानं आपल्या 2023 च्या सीझनची सुरुवात दोहा येथे झालेल्या डायमंड लीग चॅम्पियन बनून केली होती. या स्पर्धेत नीरजनं विक्रमी 88.67 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकलं. आता नीरजला त्याची पुढची स्पर्धा नेदरलँड्सच्या हेंगलो येथे खेळायची आहे. ही स्पर्धा फॅनी ब्लँकर्स-कोएन गेम्स आहे, जी 4 जूनपासून सुरू होईल. यानंतर नीरजला 13 जून रोजी फिनलंडमधील तुर्कू येथे होणाऱ्या पावो नुर्मी गेम्समध्ये आपलं कौशल्य दाखवायचं आहे.

 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत नीरजनं इतिहास रचला. भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या यशानंतर नीरजचा अद्भूत प्रवास सुरू आहे. यावर्षी त्यानं डायमंड लीग जिंकून इतिहास रचला आणि आता तो जागतिक नंबर 1 भालाफेकपटू बनला आहे.

Advertisement

Advertisement