दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) घेतला आहे. या नोटा बँकांत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आता ही नोट बँकेत बदलून घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार, असा प्रश्न प्रत्येक बँक ग्राहकाला पडला आहे. यावर स्टेट बँक ऑफ इंडियाने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
दोन हजार रुपयाची नोट बदलून घेण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने रविवारी स्पष्ट केले की, बँकेचे ग्राहक आता कोणतीही मागणी स्लिप न मिळवता त्यांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात. ग्राहकांना त्या वेळी कोणताही ओळख पुरावा किंवा कोणताही फॉर्म सादर करण्याची आवश्यकता नाही. एका वेळी 20,000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून दिल्या जातील.
स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या सर्व शाखांना ग्राहकांची गैरसोय न करता सुरळीत आणि अखंडपणे नोटा बदलून देण्याचे काम सुरु ठेवावे यासाठी सहकार्य करावे, असे सांगितले आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवार १९ मे रोजी 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये बदलून घेण्यास सांगितले आहे. सर्व बँकांना 30 सप्टेंबरपर्यंत 2,000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलण्याची सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने एका निवेदनात म्हटले आहे की, बँकांना तात्काळ प्रभावाने दोन हजार रुपयांच्या नोटा देणे थांबवण्यास सांगितले आहे. एका वेळी जास्तीत जास्त रु 20,000 (रु. 2,000 च्या 10 नोटा) बदलण्याची परवानगी दिली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.