Advertisement

सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयकडून समीर वानखेडेंची 5 तास चौकशी

प्रजापत्र | Sunday, 21/05/2023
बातमी शेअर करा

आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची खंडणी केल्याप्रकरणी सीबीआयने (CBI) सलग दुसऱ्या दिवशी तत्कालीन एनसीबी अधिकारी (NCB) आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पाच तास चौकशी केली.  चौकशी संपल्यानंतर सत्यमेव जयते म्हणत समीर वानखेडे सीबीआय कार्यालयातून बाहेर पडले. शनिवारीदेखील सीबीआयने वानखेडे यांची चौकशी केली होती. शनिवारीदेखील 5 तास चौकशी झाली होती. वानखेडे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सीबीआय सोमवारी आपलं म्हणणं सादर करणार आहे. 

 

 

एनसीबीने समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने वानखेडे यांचे निवासस्थान आणि इतर संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाई विरोधात वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशानुसार, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी 19 मे रोजी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने वानखेडेंना 22  मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शनिवार-रविवारी वानखेडे यांची सलग दोन दिवस पाच तास चौकशी करण्यात आली. 

 

 

आर्यन खान प्रकरण आणि बेहिशोबी मालमत्ता यासंबंधी सीबीआयने आर्यन खान यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली. समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी दिल्लीतून देखील सीबीआयची टीम दाखल झाली आहे. वानखेडेंची प्रॉपर्टी, महागड्या गाड्या आणि परदेश वाऱ्यांवरील खर्च यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे. आज, रविवारी दिवसभरात 5 तास चौकशी झाली. चौकशी संपल्यानंतर  कोणतीही प्रतिक्रिया न देता वानखेडे रवाना झाले. सीबीआय कार्यालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी 'सत्यमेव जयते' एवढंच म्हटले. 

 

 

हायकोर्टात सीबीआय आपलं म्हणणं सादर करणार
वानखेडे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. सोमवारी सीबीआय वानखेडे यांच्या चौकशीबाबत कोर्टात आपलं म्हणणं सादर करणार आहे.  वानखेडे यांनी चौकशीत सहकार्य करावे असं सांगताना हायकोर्टाने त्यांना 22 मे पर्यंत अटक करू नये असे निर्देश दिले. दोन दिवस झालेल्या चौकशीनंतर सीबीआय उद्या कोर्टात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

 

 

या प्रश्नांची सरबत्ती?
सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान केसमधील वादग्रस्त घडामोडी, 50 लाख रुपये कथितरित्या स्वीकारल्याचा आरोप, ज्ञानेश्वर सिंह यांच्याशी वादग्रस्त संवाद आणि खुद्द NCBच्या SITनं सादर केलेला अहवाल या सगळ्यांवरून वानखेडेंवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली असल्याची चर्चा आहे. आर्यन खानला सोडवण्यासाठी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागितल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे.

Advertisement

Advertisement