मुंबई : मुंबई इंडियन्ससाठी आता प्ले ऑफचं समीकरण आलं आहे. मुंबईने किती षटकांमध्ये सामना जिंकला तर आरसीबीला नेमकं काय करावं लागेल, याची माहिती आता समोर आली आहे.
पहिलं समीकरण...
या समीकरणानुसार जर मुंबई इंडियन्सने हा सामना फक्त आठ षटकांमध्ये जिंकला तर आरसीबीला ४० धावांनी त्यांचा सामना जिंकवा लागेल आणि त्यानंतर ते प्ले ऑफमध्ये पोहोचतील, पण जर आरसीबीच्या संघाला ४० पेक्षा कमी धावांनी विजय मिळवला तर मुंबई इंडियन्सचा संघ हा प्ले ऑफमध्ये जाऊ शकतो.
दुसरं समीकरण...
जर मुंबईच्या संघाने हा सामना १० षटकांमध्ये जिंकला तर आरसीबीच्या संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी २० धावांनी विजय मिळवावा लागेल. जर २० पेक्षा कमी धावांनी त्यांनी विजय मिळवला तर मुंबईचा संघ हा प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो.
तिसरं समीकरण...
मुंबई इंडियन्सच्या संघाने जर या सामन्यातक १२ षटकांमध्ये विजय मिळवला तर आरसीबीने फक्त सामना जिंकला तरी त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचता येऊ शकते. त्यामुळे मुंबई इंडियन्स जेवढ्या लवकर सामना जिंकेल तेवढी त्यांची प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता जास्त असेल.
मुंबईचा हा अखेरचा साखळी सामना आहे आणि त्यानंतर आरसीबीचा सामना होणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने विजय मिळवला तरी त्यांना आरसीबीच्या सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. मुंबईने घरच्या मैदानावर सहापैकी चार सामने जिंकले आहेत. त्यांना निव्वळ धावगती उंचावण्याची आज अखेरची संधी आहे. चौदा गुण असलेल्या राजस्थानची (०.१४८) निव्वळ धावगती मुंबईपेक्षा (-०.१२८) सरस आहे. त्यातच मुंबईला कदाचीत विजयही पुरेसा ठरणार नाही. बेंगळुरूच्या निव्वळ धावगतीस (०.१८०) मागे टाकणे मुंबईसाठी खूपच अवघड आहे. रोहित शर्मा आणि त्याच्या साथीदारांना गुजरातविरुद्ध दणदणीत विजयाची सधी असताना रशीद खानने केलेली फटकेबाजी तसेच लखनऊविरुद्ध स्वीकारावी लागलेली पाच धावांनी हार सलत असेल. खराब गोलंदाजीचा मुंबईला यंदाच्या लीगमध्ये चांगलाच फटका बसला आहे. याची पुनरावृत्ती मुंबईला आज परवडणार नाही. कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीतील चढऊतार जास्त चिंतेची बाब आहे. रोहितच्या अपयशामुळे सुर्यकुमार यादव, टीम डेव्हीड, कॅमेरुन ग्रीन, इशान किशन आणि नेहल वढेरा यांच्यावरील दडपण वाढत आहे. मोसमाची सांगता विजयाने करण्याचे हैदराबादचे लक्ष्य असेल. हेच लक्ष्य मुंबईची समीकरणे जास्त अवघड करू शकेल. त्यामुळे आता मुंबई किती षटकांत हा विजय मिळवते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.