बीड दि.20 (प्रतिनिधी):शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रा शनिवारी बीडमध्ये पार पडली. या यात्रेच्या जाहीर सभेत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर मोठ्या प्रमाणावर टिका केली. कर्नाटक राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 37 सभा आणि 27 रोडशो केले मात्र त्यानंतरही तेथील जनतेने मोदींचा दारूण पराभव केला. राज्यातही अशीच परिस्थिती पहायला मिळणार आहे. एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी निवडणूकीत नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा फोटो लावून निवडून यावे, मी राजकारण सोडतो अशी घोषणा खा.संजय राऊत यांनी बीडमध्ये जाहीर सभेतून केली. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न वापरता, तुमच्यात धमक असेल तर तुम्ही निवडून या, तुम्हाला बाळासाहेबांच्या फोटोशिवााय काय किंमत आहे, ही महाराष्ट्राची जनता दाखवून देईल असे ते म्हणाले.
बीडच्या माने कॉम्प्लेक्स समोरी, पारसनगरीमध्ये शिवसेनेची जाहीर सभा शनिवारी रात्री पार पडली. या सभेला जिल्हाभरातून शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी सुषमा अंधारे, चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. यावेळी संजय राऊत यांनी जेव्हा महाप्रबोधन यात्रा सुरू झाली, तेव्हा मी तुरुंगात होतो आज मी बीडमध्ये या यात्रेसाठी उपस्थित राहिलो याचा प्रचंड आनंद वाटत असल्याचे सांगितले. बीडची महाप्रबोधन यात्रा नव्हे तर विजय यात्रा असल्याचे मला जाणवले. शिंदे सरकारने सामान्यांसाठी ‘आनंदाचा शिधा’ आणला. या शिध्यातून गोरगरीबांना 1 किलो साखर, 1 किलो चणादाळ, 1 लिटर पामतेल दिले. सामान्यांना आनंदाच्या शिधातून असले हलक्या वस्तू देत स्वत:ला मात्र 40 -50 कोटी रुपये भाजपकडून घेतले आणि सेना फोडली. आज शेतकर्यांची काय अवस्था आहे. बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना 2022 चे अजुनही अनुदान मिळाले नाही, मी आज महाप्रबोधन यात्रेसाठी आल्यानंतर मला येथील शेतकर्यांनी निवेदन देवून आमच्या अनुदानाचं बघा अशी मागणी केली. हे सरकार नेमकं करतयं काय? असा सवालही यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.
दोन हजारांच्या नोटा तुमच्याकडेच
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी 2000 च्या नोटा चलनातून बाद केल्याचे सांगितल्यानंतर नोटा बदलण्यासाठी तिच सप्टेंबरची मुदत दिली होती. यावर संजय राऊत यांनी भाष्य करताना मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले. दोन हजारांच्या नोटा सामान्यांकडे आहेतच कोठे? या सर्व नोटा भाजपच्या मंत्री आणि मिंदे गटाकडे आढळून येतील. आज सामान्यांचे जगण्याचे वांदे आहेत. त्यामुळे दोन हजारांच्या नोटा आमच्याकडे नव्हे तर त्या तुमच्याकडेच आढळुन येतील असेही राऊत म्हणाले.
मोदी एक नंबर फेकू
यावेळी संजय राऊत यांनी महाप्रबोधन यात्रेत नरेंद्र मोदींचा चांगलाच समाचार घेतल्याचे पहायला मिळाले. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत हे मोठं दुर्दैवं असल्याचे सांगितले. मोदी हे एक नंबरचे फेकू आहेत. तुम्ही गुगलवर फेकू टाकलं की तुम्हाला मोदींचा फोटो समोर येतो. त्यामुळे देशातील जनतेला आता या फेकूचा चेहरा खर्या अर्थाने कळला असल्याचे राऊत म्हणाले.
अंधारेंनी मोदी, फडणवीसांची व्हिडीओतून केली पोलखोल
महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर सभेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्हिडीओतून पोलखोल केली. लोकसभा निवडणूकीत राज ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडीओतून’ देशभर धुमाकूळ घातल्याचे पहायला मिळाले होते. यातून भाजपचा खरा चेहरा समोर आणण्याचे काम राज ठाकरेंनी केल्यानंतर बीडमध्येही सुषमा अंधारेंनी मोदी आणि फडणवीसांचा व्हिडीओच्या माध्यमातून समाचार घेतला. यावेळी त्यांनी मोदींच्या घोषणा आणि फडणवीसांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखती लावत हे दोन्ही नेते किती खोटारडे आहेत हे जनतेच्या समोर आणले. यावेळी अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टिका केली. तुम्ही 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांना मोफत बससेवेचा लाभ दिला, महिलांना अर्धे तिकीट सुरू केले मात्र ते आम्हाला नकोय, तुम्ही त्यापेक्षा 1250 चा गॅस 300 रुपयांना द्या, सामान्यांची ती मागणी आहे. तुम्ही दिलेले जनतेला पटलेले नाही. सामान्यांच्या जगण्याचे प्रश्न सुटावेत अशी आमची मागणी आहे. शेवगाव आणि अकोल्यात ज्या दंगली घडल्या त्या भाजपानेच घडवून आणल्या आणि हे माझे केवळ आरोप नाहीत तर याचे पुरावे देखील आपल्याकडे असल्याचे अंधारे म्हणाल्या. सामान्यांचे प्रश्न समोर येवू नयेत, रोजगाराचा प्रश्न जाणवू नये यासाठी भाजपकडून ही उठाठेव सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. अजीतदादा भाजपसोबत गेले तर हिंदूत्व धोक्यात येत नाही, मात्र भाजपला सोडून जाणारी शिवसेना यांचे हिंदूत्व मात्र धोक्यात आल्याचे भाजपाच्या वतीने सांगण्यात येते असेही त्या म्हणाल्या. तसेच शिवसेना हा आमचा पक्ष आहे आणि ते न्यायालयानेही आता सांगितले आहे. व्हिप बेकायदेशिर असेल, मतदान बेकायदेशीर असेल तर सरकार कसे कायदेशिर राहू शकते. काय कपटनिती तुम्हाला करायच्या आहेत ते करा, आगामी निवडणूकीत सर्व हिशोब आम्ही चुकता करू असा इशाराही त्यांनी दिला.