मुंबई-महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावर जो निकाल आला त्यानंतर झालेली ही पहिलीच भेट आहे. मागच्या काही दिवसांपासून घडलेल्या घडामोडी पाहता ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल देत असताना तेव्हा राज्यपालांची भूमिका संशयास्पद होती असं म्हटलं होतं. त्यानंतर कोश्यारींच्या विरोधात प्रतिक्रियाही आल्या होत्या. या सगळ्या घडामोडी झाल्यावर भगतसिंह कोश्यारी वर्षा बंगल्यावर आल्याने आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी विविध राजकीय नेत्यांची भेट घेतली. मात्र एकनाथ शिंदे यांची भेट घेणं हे महत्त्वाचं मानलं जातं आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ओघवती प्रतिक्रिया दिली आहे. तसंच आपण फारसं भाष्य करु इच्छित नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. अशात ते वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने विविध प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांचे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारसह अनेक खटके उडाले होते. तसंच या सरकारच्या कार्यकाळात आणि मविआच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे ते चांगलेच अडचणींमध्येही सापडले होते.
महाविकास आघाडीने अनेकदा कोश्यारींची राज्यपाल पदावरुन हकालपट्टी करा अशीही मागणी केली होती. अशात सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर जो निकाल दिला त्यानंतर कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा या निवासस्थानी घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते आहे. ही सदिच्छा भेट होती असं सांगण्यात येतं आहे. मात्र राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
बातमी शेअर करा