Advertisement

एक व्हॉट्सअ‍ॅप डीपी आणि ५० लाखांच्या चोरीचं रहस्य उलगडलं!

प्रजापत्र | Saturday, 20/05/2023
बातमी शेअर करा

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका फोटोमुळे तब्बल ५० ते ५५ लाखांच्या चोरीचं रहस्य उलगडलं आहे. यामध्ये ५० लाख रुपयांचे दागिने आणि ५ लाख रुपये रोख रक्कमेचा समावेश आहे. पोलिसांनी ही चोरी करणाऱ्या आरोपी महिलेला अटक केली आहे. दर महिन्याला केवळ ८ हजार रुपये कमावणाऱ्या महिलेच्या घरात एसी, फ्रीज, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून सर्व प्रकारच्या सुविधा असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.

 

भोपाळमधळ्या टीटी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी चैन सिंह रघुवंशी यांनी सांगितलं की, यांच्या पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या निशात कॉलोनी परिसरात राहणाऱ्या डॉक्टर भूपेंद्र श्रीवास्तव यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर श्रीवास्तव यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. भूपेंद्र यांचं शाहजहानाबाद येथे एक खासगी रुग्णालय आहे.

 

भूपेंद्र यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं होतं की, अलिकडच्या काही दिवसात त्यांच्या घरातील दागिने हळूहळू चोरीला जात होते. तसेच पैसेदेखील चोरीला जात होते. घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर त्यांना संशय होता. त्यामुळे त्यांनी तिला २० दिवसांपूर्वी कामावरून काढून टाकलं. परंतु त्यांच्या पत्नीकडे मोलकरणीचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर होता. एक दिवस त्या मोलकरणीने तिचा व्हॉट्सअ‍ॅप डीपी बदलला. या डीपीमध्ये तिच्या कानात जे झुमके होते अगदी तसेच झुमके माझ्या पत्नीकडेही होते. त्यामुळे माझ्या पत्नीला तिच्यावर संशय आला. त्यामुळे माझ्या पत्नीने लॉकर उघडून पाहिलं तर तिथे ते झुमके नव्हते. त्यामुळे मोलकरणीनेच घरात चोरी केली असल्याचा आमचा संशय बळावला.

 

या संशयाच्या आधारावर डॉक्टर श्रीवास्तव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोलकरणीला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. त्यानंतर मोलकरणीने चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपी महिलेच्या घरातून ५० लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त केले आहेत. ज्यामध्ये बांगड्या, टॉप्स, नेकलेस, हिरे-मोत्यांचे हार यांचा समावेश आहे. तसेच साडेपाच लाख रुपये इतकी रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे.

 

आरोपी महिलेने सांगितलं की, डॉक्टर आणि त्यांची पत्नी जेव्हा बाहेर जायचे तेव्हा ती चोरी करायची, तसेच कधी कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल तर डॉक्टरांच्या पत्नीचे दागिने परिधान करून ती त्या कार्यक्रमांना, लग्नसमारंभांना जायची. या महिलेला दर महिन्याला ८ हजार रुपये इतका पगार मिळतो, तर तिचा पती दर महिन्याला १५ ते २० हजार रुपये कमावतो. परंतु तिच्या घरात एसी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सगळ्या सुविधा आहेत.

Advertisement

Advertisement