कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव केल्यानंतर महाराष्ट्रात भाजप विरोधी पक्षात नवचैतन्य निर्माण झालं आहे. राज्यात महाविकास आघाडीतील पक्षानी बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना अजून एका वर्षा पेक्षा जास्त अवधी असताना आताच मविआमध्ये जागा वाटपावर चर्चा चालू आहे.
तर महाविकास आघाडी आणखी मजबूत करण्यासाठी आघाडीतील नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान आता महाविकास आघाडीची ताकत आणखी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीची या आठवड्यात मुंबईत बैठक पार पडणार आहे.
या बैठकीला मविआचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विधानसभा आणि लोकसभेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या बैठकीला ठाकरे गटासोबत युती असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मागील काही महिन्यांपासून प्रकाश आंबेडकरांना मविआमध्ये सामील करण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत.
तसेच प्रकाश आंबेडकर यांनी देखील महाविकास आघाडीत सामिल होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता मविआच्या जागा वाटपाच्या बैठकीला आंबेडकर आल्यास मविआला खुप मोठा फायदा होणार आहे. तसेच मविआची वज्रमुठ देखील अजून घट्ट होवू शकते.
२०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीचे जवळपास २०-२५ उमेदवार पडले होते.
वंचित बहुजन आघाडीचा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे वंचित मविआमध्ये दाखल झाली तर भाजपचा सुफडा साफ होवू शकतो. राज्यातील प्रमुख चार पक्ष एकत्र आले तर पुन्हा राज्यात मविआचं सरकार येवू शकतं.