Advertisement

हरवलेल्या मुलीच्या तपासासाठी पोलिसांनी पालकांकडून पैसे घेतल्याची तक्रार

प्रजापत्र | Friday, 19/05/2023
बातमी शेअर करा

नेकनूर दि. १९ (वार्ताहर)-:नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेले अवैध धंदे, गोवंश तस्करी, चोरांना सोडून देणारे पोलीस हे नेहमीचेच असतानाच आता चक्क ज्याची मुलगी हरवली त्या पित्याकडून तपासासाठी पोलीस पैसे घेत असल्याची आणि त्यानंतर देखील शोध लावीत नसल्याची तक्रार मुलीच्या पित्याने केली आहे. त्यामुळे येथील ठाणेदार शेख मुस्तफा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

 

     नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागच्या काही काळात पोलिसांची मनमानी सुरु आहे. गुन्हे दाखल करून घेण्यासाठी तक्रारदारांना पोलीस अधीक्षकांकडे यावे लागते इतकी वाईट परिस्थिती आहे. त्यातच आता मुलगी हरवलेल्या पित्याकडून देखील पोलीस पैसे मागत असल्याची तक्रार सदर मुलीच्या पित्याने थेट पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. दत्ता खराडे यांनी आपल्या मुलीचा शोध लावण्यासाठी नेकनूर पोलिसांनी २५ हजार रुपये घेतल्याचे म्हटले आहे. तसेच त्यानंतर देखील तपस करण्यासाठी तुम्ही स्वतः चारचाकी गाडी घेऊन या असे पोलीस सांगत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे नेकनूर पोलिसांनी माणुसकी विकली आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.एकीकडे राज्यभरात मुली हरवण्याचा प्रकाराबाबत तीव्र चिंता व्यक्त होत असतानाच जर हरवलेल्या मुलीच्या शोधासाठी पालकांची पोलिसच आथिर्क पिळवणूक करणार असतील तर सामान्यांनी न्याय मागायचा कोणाकडे हा प्रश्न आहे.

 

 

अनेक तक्रारी, पण वरिष्ठांचे अभय
नेकनूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शेख मुस्तफा यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. ते फिर्यादींशी नीट बोलत नाहीत हे देखील अनेकदा समोर आले आहे. त्यांच्या कार्यकाळात पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांपासून ते गोवंश तस्करीपर्यंत अनेक प्रकार वाढल्याचे देखील समोर आले. मात्र तरीही वरिष्ठांची त्यांच्यावर इतकी मर्जी का आहे आणि त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे. 
 

Advertisement

Advertisement